नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात कांद्याच्या व्यापाऱ्यांवर छापेमारी सुरु झाली आणि त्याचा इफेक्ट लगेच दिसायला लागला. कांद्याचे घाऊक बाजारातील दर तब्बल 35 टक्क्यांनी घसरले.


नाशिक जिल्ह्यात आयकर विभागाच्या 120 अधिकाऱ्यांच्या पथकाकडून 7 व्यापारी, 25 घरं, गोदामं आणि कार्यालयाची झाडाझडती सुरु आहे. साठेमारी करुन कांद्याचे दर वाढवणाऱ्या व्यापाऱ्यांना वेसण घालण्यासाठी ही कारवाई सुरु केल्याची माहिती आहे.

या छापेमारीमुळे व्यापाऱ्यांचं धाबं दणाणलं आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. पुढील दोन दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे.

गेल्या काही दिवसात मुंबईत कांद्याने तिशी गाठली. पण शेतकऱ्यांना फक्त 15 रुपयांचा दर मिळायचा. मधलं कमिशन व्यापारी लाटायचे. साठेमारी करुन कांद्याचे दर वाढवण्यात व्यापाऱ्यांचा हात असल्याचा आरोप आहे. ज्याचं सत्य आयकरच्या छापेमारीतून बाहेर यायला हवं.