हरी ठाकूर नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील एक सलून व्यवसायिक आहेत. माँ दुर्गा नावाचं त्यांचं मेन्स पार्लर आहे. 30 वर्षांपूर्वी ठाकूर आपल्या परिवारासह उत्तर प्रदेशहून नाशिकमध्ये आले. कॅम्प परिसरात त्यांनी एक छोटी टपरी टाकून सलून व्यवसायाला सुरुवात केली. मात्र त्यातून कुटुंब चालवणं कठीण जात असल्याने त्यांनी एक दुकान टाकून व्यवसाय वाढवण्याचा निर्णय घेतला आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या देवळाली कॅम्प शाखेत जाऊन मोदी सरकारच्या मुद्रा लोन बाबत त्यांनी जाणून घेतलं.
बँकेनेही त्यांची आर्थिक परिस्थिती पडताळत मुद्राच्या शिशू, किशोर आणि तरुण या तीन प्रकारातून किशोरच्या प्रकारात बसवत ठाकूर यांच्या मागणीनुसार चार लाख रुपयांचं कर्ज त्यांना मंजूर केलं. यामुळे व्यवसायात त्यांना मोठी मदत झाली. भविष्यात अजून व्यवसाय वाढवणार असल्याचं ते सांगतात.
महिन्याला 44 हजार रुपयांचा व्यवसाय
हरी ठाकूर यांना 15 डिसेंबर 2017 रोजी बँक ऑफ महाराष्ट्रने मुद्रा लोन मंजूर केलं. त्याच जोरावर त्यांच्या व्यवसायात भर पडली. सुरुवातीला महिना 25 हजार रुपये कमवणारे हरी ठाकूर आज महिना 44 हजार रुपये कमवत आहेत. विशेष म्हणजे डोक्यावर कर्जाचा बोजा जास्त दिवस राहू नये म्हणून पुढील 10 महिन्यांचे हफ्ते त्यांनी आधीच भरुन टाकले आहेतत. हिच गोष्ट त्यांना मोदींपर्यंत घेऊन गेल्याचं बँक मॅनेजर सांगतात.
मोदींचा मराठीतून संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट आपल्याशी बोलणार आहेत या गोष्टीवर ठाकूर यांचा खरं तर पहिले विश्वास बसत नव्हता. मात्र आज सकाळी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बँकेच्या अधिकाऱ्यांसह जाऊन ते पोहोचले आणि मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांच्याशी मराठीतून ‘काय म्हणताय ठाकूर’ असं म्हणत बोलायला सुरुवात केली.
केंद्रात भाजपचं सरकार येताच त्यांनी आवास योजना, मुद्रासह अनेक योजना राबवायला सुरुवात केली. त्यामुळेच हरी ठाकूर यांच्यासारख्या छोट्या व्यवसायिकांना व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठी मदत झाली आहे.
पाहा व्हिडीओ :