होर्डिंग बाजूला ठेवल्यानं मनसे पदाधिकाऱ्यांची व्यापाऱ्याला मारहाण
प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक | 28 Oct 2016 07:09 PM (IST)
नाशिक: सोसायटीच्या आवारातील जाहिरातीचं होर्डिंग उचलून बाजूला ठेवल्याच्या रागातून नाशिकमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण झाली आहे. मनसेचा पदाधिकारी असलेल्या सत्यम खंडाळेंनी काही साथीदारांसह व्यापारी असलेल्या अमित पवार यांना मारहाण केली. काल सकाळी झालेल्या मारहाणीचे काही दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. ज्यात सत्यम खंडाळे आणि व्यापाऱ्यात वाद झाल्याचं दिसतं आहे. व्यापाऱ्यानं खंडाळेचे काही होर्डिंग सोसायटीच्या आवारातून उचलून मागच्या बाजूला ठेवले होते. याचाच राग मनात धरुन ही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी आज सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये पवार यांनी तक्रार केली. पण, त्या आधीच सत्यम खंडाळेनं देखील व्यापाऱ्याविरोधात तक्रार केल्यानं पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.