नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीवरुन सरकारवर ताशेरे ओढलेत. सत्ताधाऱ्यांच्या सोयीचा हा मुद्दा आहे आणि म्हणून तिथे सोयीनुसार, सत्ता स्थाप करण्यासाठी, विजय मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला गेला असं ते म्हणाले. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरी ईडी कारवाईबाबतही राज ठाकरेंनी भाष्य केलंय.  'ते' गृहमंत्री ईडीला 'वेडे' समजलेत बहुदा, असं म्हणत राज ठाकरेंनी उपरोधिक टोला लगावला आहे. 


बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "प्रभागांची तोडफोड करुन आपल्याला हवे तसे प्रभाग करणं योग्य नाही. लोकांनी एकाऐवजी तीन तीन बोटं का दाबायची? निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी." पुढे बोलताना "कायदे वेगवेगळे का? 2, 3, 4 प्रभाग हा खेळ कसला? उद्या 2-2 आमदारांचा, खासदारांचा प्रभाग करणार आहात का? ग्राम पंचायत, जिल्हा परिषदेला प्रभाग का नाही, महापालिकेलाच प्रभाग का? सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी हे आहे का? आम्ही आमचे मार्ग अवलंबवूच, पण आता जनतेनं विरोध करावा, कोर्टात जावं, निवडणूक आयोगाकडे जावं.", असंआवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे. 


राज ठाकरे म्हणाले की, "कुठलाही नगरसेवक काम करु देत नाही, प्रभागामध्ये कामं होत नाही. उद्या लोकांनी ठरवलं नगरसेवकाला भेटायचं आहे, तर त्यांनी कोणत्या नगरसेवकाला भेटायचं? सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीची थट्टा करुन टाकली आहे. गृहित धरणं सुरु आहे. आम्ही बोललं की, राजकीय वास येतो. चार प्रभाग होते, त्याचे तीन का? दोन होते त्याचे चार प्रभाग का? सरकारनं नेमका आपला उद्देश काय आहे हे सांगावं. गेल्या दहा वर्षांत हा खेळ सुरु आहे. आपण फक्त उघड्या डोळ्यानं बघत राहायचं का?"


'ते' गृहमंत्री ईडीला 'वेडे' समजलेत बहुदा : राज ठाकरे


माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरी ईडी कारवाईबाबतही राज ठाकरेंनी भाष्य केलंय. राज ठाकरे म्हणाले की, "सरकारच्या कोरोनाच्या लाटा थांबतच नाहीत. टोलवरुन आम्ही आंदोलनं केली, अनेक टोल बंद झाले. सरकार आणि विरोधक येतात तेव्हा त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. शरियतसारखा कायदा आणा, त्याशिवाय सुधारणार नाहीत. त्याचं कारण म्हणजे भीती नाही उरली कशाची. गृहमंत्र्यांना ईडी बोलावते, गृहमंत्री जात नाहीत, ते ईडीला येडा समजतात."