नाशिकमधील विकासकामं नामशेष करण्याचा भाजपचा डाव: मनसे
एबीपी माझा वेब टीम | 05 May 2017 07:46 AM (IST)
नाशिक: गेल्या 5 वर्षात मनसेनं नाशिकमध्ये केलेल्या विकासकामांना नामशेष करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप मनसेकडून केला जात आहे. आधी विजेचा खेळखंडोबा करुन बोटॅनिकल गार्डनमधील लेझर शो बंद पाडला. आता वाहतूक नियोजनाच्या नावाखाली लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेली वाहतूक बेटं तोडण्यात येत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे. शहरातील एबीबी सर्कलवरील योगासनं थिम असलेलं वाहतूक बेट एका रात्रीत गायब झाल्यानं मनसे आक्रमक झाली आहे. नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनमधील लेझर शो बंद झाल्यानंतर मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी यावरुन भाजपवर जोरदार हल्ला केला. ‘लेझर शो 12 दिवस बंद आहे. तरी देखील प्रशासन अजूनही ढिम्म आहे. या सर्व कृत्यातून मनसेनं केलेली कामं नाशिकरांच्या स्मृतीतून पुसली जातील अस जर भाजपला वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. निवडणुकीतील निकाल हे तत्कालीन असतात. जय-पराजय यांची ही मालिका सुरुच असते. दुसऱ्या पक्षाच्या कार्यकाळात झालेली विकासकामं नष्ट करण्याचा भाजपनं पाडलेला पायंडा हा अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही त्याचा निषेध करतो.’ अशा शब्दात मनसेनं भाजपवर निशाणा साधला. राज ठाकरेंच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला महावितरणचा झटका वीजेच्या खेळखंडोब्यामुळे बोटॅनिकल गार्डनमधला बोलक्या झाडांचा लेझर शो अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे. वारंवार विजेचा पुरवठा खंडीत होत असल्यानं या शोमधले 25 दिवे खराब झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. रतन टाटांच्या सीएसआर फंडमधून 23 कोटी रुपये उभारुन राज ठाकरेंनी हा प्रोजेक्ट साकारला होता. ज्याला नाशिककरांकडून मोठा प्रतिसादही मिळाला होता. संबंधित बातम्या: