नाशिक : "माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असं अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं.
भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला.
संभाजी भिडे म्हणाले की, "भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे."
अहमदनगरला आता फक्त अंबिका नगर म्हणायचं : भिडे गुरुजी
मतासाठी सर्व पक्ष लाचार
शिवाजी महाराज देवांना वाचवणारा देव होता. 33 कोटी देव 12 ज्योतिर्लिंग शिवाजी महाराज यांनी वाचवले. शिवाजी, संभाजी महाराज यांचे नाव आल्यावर अंगात स्फुरण चढते. शिवाजी महाराजांचे सिंहासनासाठी केंद्र राज्य सरकारने पॅकेज दिले तरी ते स्वीकारणार नाही. प्रत्येक पक्ष राजकारणासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतोय. कुठल्याही पक्षाच्या झेंड्यात आडवी किवा उभी हिरवी रेघ आहे. मतासाठी हे सर्व लाचार आहेत. आदिलशाही, मुघलशाहीविरोधात शिवाजी महाराजांनी लढा दिला, मुसलमान देशाचे शत्रू आहेत, असं संभाजी भिडे म्हणाले.
राजगडावर जाणाऱ्या तुकडीत स्त्रियांना स्थान नाही
शिवाजी महाराजांच्या सिंहासनासाठी शिवभक्तांनी पुढे आले पाहिजे. प्रत्येक तालुक्यातील दोन हजार कार्यकर्त्यांची तुकडी तयार केली जाणार असून ही तुकडी राजगडावर जाईल, या तुकडीत स्त्रियांना स्थान नाही. स्त्रियांनी जिजामातेच काम करावं, रणांगणावर उतरु नये आमची तशी इच्छा नाही. स्त्रियांना तुकडी बनवण्यास अनुमती नाही, असं भिडेंनी सांगितलं. तसंच यानंतर दारुविरोधी लढा देणार, बलात्कार करणाऱ्यांचे सरकारने हात-पाय कलम केलं पाहिजे, नाहीतर ते काम आम्ही हाती घेऊ, असा इशाराही संभाजी भिडेंनी दिला.
माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली : संभाजी भिडे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jun 2018 12:12 PM (IST)
भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -