नाशिक: क्षुल्लक कारणावरुन तीन जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला इगतपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कुणाल हरकारे असं आरोपीचं नाव आहे. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात काल दुपारी कुणाल हरकारे आणि प्रशांत बोरसे यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतर कुणाल हरकारे रात्री 10 च्या सुमारास प्रशांत बोरसेच्या घराजवळ आला. त्याने तिथेच बसलेल्या प्रशांत बोरसे, त्याचा भाऊ दीपक बोरसे आणि बबली गुप्ता यांच्या अंगावर पेट्रोल ओतलं. मग आग लावून त्यांना जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला.


या घटनेत तिघांनाही दुखापत झाली. मात्र प्रशांत बोरसे हा 60 टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर आहे. तिघांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे सर्व कृत्य करुन कुणाल हरकारे फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली होती. अखेर पहाटेच्या सुमारास तो रेल्वेने आपल्या गावी पळून जाण्याच्या बेतात असतानाच, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करत, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी कुणाल हरकारे हा मूळचा अकोल्याचा असून तो मजुरीचं काम करतो. काही महिन्यांपासून प्रशांत बोरसे आणि त्याच्यामध्ये वाद होते. त्यामुळेच त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं. गणपती विसर्जन मिरवणुकीचा या वादाशी काहीही संबंध नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.