Nashik Sawarpada Bridge : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सावरपाडा येथे वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तातडीने नव्याने पूल बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सावरपाडा गावातील वाहुन गेलेल्या पुलाच्या ठिकाणी तहसीलदारांसह इतर अधिकारी यांनी आज पाहणी केली. या पाहणीबाबतचा अहवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी मागवून घेतला होता. त्यानुसार लगेचच पाऊले उचलत नवीन पुलाच्या उभारणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.


सावरपाडा गावातील गावकऱ्यांच्या पूल, रस्ते आदी समस्यांची गंभीरपणे दखल घेतली जाईल. पुढील काही दिवसांत गावांत सकारात्मक बदल दिसतील असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी गावकऱ्यांना दिला आहे. निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसात पूल वाहून गेल्याचं वास्तव एबीपी माझानं महाराष्ट्र समोर आणलं होतं.  एकीकडे आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती म्हणून विराजमान होत असताना दुसरीकडे आदिवासी पाड्यावरील आदिवासींची ससेहोलपट सुरू होती. एबीपी माझाच्या वृत्ताची स्थानिक प्रशासनानं तात्काळ दखल घेतली असून पुल पुन्हा उभारला जाणार आहे. पाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनालाही अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागली. नव्यानं उभारला जाणारा पुल आधीच्या पुलापेक्षा उंच टेकडीवर उभारला जाणार आहे. सावरपाड्यातील नागरिकांच्या समस्येवर यंदा कायमस्वरुपी तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे. 


नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या खरशेत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील  सावरपाडा मधील आदिवासी महिलांचा पाण्यासाठीचा जीवघेणा प्रवास, लहान मुलांचा थरकाप उडविणारा संघर्ष यापूर्वीही एबीपी माझानं उभ्या महाराष्ट्रासमोर मांडला होता. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरीही सावरपाड्यात नदी ओलांडण्यासाठी पूल नव्हता. जल जीवन मिशन नावाची 3 लाख 60 हजार कोटींची योजना राबवण्याचं एक मोठ स्वप्न सरकारनं लोकांना दाखवलं. अनेकांना तर घरच्या अंगणात पाणी खेळण्याची स्वप्न पडली.  पण  सरकारच्या योजना समाजात तळापर्यंत कशा झिरपत नाहीत याचं दाहक वास्तव एबीपी माझानं समोर आणलं होतं. आपल्या महाराष्ट्रातलंच एक गाव जे शहरापासून फार दूरही नाही. नदी उशाला, मात्र प्रदुषणाचं पातक घेऊन वाहणारी. पण त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी इथल्या महिलांची परवड आणि लहानग्यांचा जीवघेणा प्रवास  एबीपी माझानं दाखवला होता