मनमाड : आशिया खंडातील सर्वात मोठी बाजरपेठ अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समिती आवारातील कांदा आणि भुसार मालाचे लिलाव 1 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. मार्च एन्डचे कारण सांगत व्यापाऱ्यांनी बाजार समितीला पत्र देत लिलावात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे.
साप्ताहिक सुट्ट्या आणि रंगपंचमी यामुळे बाजार समितीला बंद आहे. तर मंगळवारपासून 1 एप्रिलपर्यंत व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्याने तब्बल दहा दिवस बाजार समिती बंद राहणार आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी होणार आहे.
सध्या परिसरातील शेतकऱ्यांकडे लाल कांदा पडून असून, हा कांदा जास्त दिवस टिकणारा नसतो. अशा परिस्थितीत दहा दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी होणार आहे. तसेच जेव्हा बाजार समिती सुरु होईल तेव्हा कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.