नाशिक : नाशिकमध्ये प्रसिद्ध आयटी तज्ज्ञ कौशल बाग या विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी कौशलचं कौतुक केल्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला होता. मात्र अचानक त्याने टोकाचं पाऊल उचलल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे.
नाशिकच्या अशोका मार्ग परिसरातील अॅपल ईट सोसायटीमध्ये दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कौशलने गळफास घेतला. त्याचा भाऊ घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. कौशलच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
कौशल बाग नाशिकच्या के. के. वाघ कॉलेजमध्ये आयटीचं शिक्षण घेत होता. नाशिक कुंभमेळ्याच्या वेळी हेल्पिंग हॅंड्स नावाचं मोबाईल अॅप त्याने तयार केलं होतं. हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हे अॅप उपयुक्त ठरत होतं. या कार्यामुळे नाशिकचे पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी कौशलचा जाहीर सत्कारही केला होता.
नाशिक पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पोलिस मॅरेथॉनचं ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून कौशलने फेसबुक लाईव्ह केलं होतं. त्याबद्दल मार्क झुकरबर्गनंही कौशलचं कौतुक केलं होतं. कौशलच्या अचानक जाण्यानं कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.