नाशिक : शरदरावजी पवार नागरी पतसंस्थेत घोटाळा झाल्याचं उघड झालंय. या पतसंस्थेतून तब्बल 4 कोटी 55 लाख रुपयांचे बेकायदेशीर कर्जवाटप करण्यात आल्याचं समोर आलंय.


नाशिक जिल्ह्यातील वणी पोलिस ठाण्यात याप्रकरणी संचालक मंडळासह सनदी लेखापाल आणि संबंधित कर्मचारी अशा एकूण 18 जणांवर फसवणुकीसह महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र शासन सहकार विभागाच्या विशेष लेखापरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या पतसंस्थेचे 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2011 या कालावधीचे फेरलेखापरीक्षण करण्यात आले असता, 4 कोटी 55 लाख 59 हजार रुपयांचे बेकायदेशीर कर्जवाटप केल्याचं निदर्शनास आले. त्यांनी खोटे दस्तऐवज आणि हिशेबपत्र देखील तयार करून संस्थेची फसवणूक केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलय.

विशेष म्हणजे सनदी लेखापाल बिपीन जैन यांनी देखील शासकीय जबाबदारीचे पालन न करता खोटा अहवाल तयार करून संस्थेचे खोटे आर्थिक चित्र तयार करून ठेवीदार सभासदांची फसवणूक केल्याचही दिसून आल्याने त्यांच्यावर देखील शासनाच्या परवानगीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत असून यामुळे वणीमध्ये एकच खळबळ उडालीय.