इगतपुरीत चिमुरड्याचे पुरलेले अवशेष सापडले, नरबळीचा संशय
एबीपी माझा वेब टीम | 19 Aug 2016 09:48 AM (IST)
नाशिक: इगतपुरी तालुक्यात नरबळीच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देवगाव शिवारात नवजात बाळाच्या मृतदेहाचे अवशेष आढळल्यानं खळबळ उडाली आहे. देवगाव शिवारातील वन विभागाच्या जागेत गुरांनी गवत खाताना जमीन उकरली. यादरम्यान, मृत बाळाचे अवशेष एका गुराख्याच्या नजरेला पडले. याच भागात दीड वर्षापूर्वी 4 ते 5 लोकांचा नरबळी देऊन पुरल्याचं उघड झालं होतं. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. तसेच हा प्रकार नरबळीचाच आहे की नाही हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.