नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागात भूगर्भामध्ये पेट्रोलियम पदार्थांचा मोठा साठा असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिंडोरी तालुक्यातील दळवट, कनाशी, अभोणा भागात सध्या सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे.


हैदराबादच्या अल्फा जीओ इंडियन कंपनीमार्फत हे सर्वेक्षण सुरु करण्यात आलं आहे. ज्या परिसरात पेट्रोलियम पदार्थांचे साठे असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या भागात बोअरवेल घेऊन याची पडताळणी करण्यात येत आहे.

देशातील गाळयुक्त भागात हायड्रो कार्बनचे साठे आहेत कि नाही याबाबत ओएनजीसीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केलं जात आहे. त्याच अंतर्गत नाशिकच्या पश्चिम भागातील सर्वेक्षणाला सुरवात झाली आहे. हे प्राथमिक स्वरुपाचे सर्वेक्षण असून महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यामधून सर्वेक्षण माहिती संकलित केली जाणार आहे. महाराष्ट्रातून डेटा संकलित करण्याच्या कामासाठी ६५० कोटी रुपयांचा अंदाजित खर्च आहे.