नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ, अनेक वाहनं वाहून गेली
एबीपी माझा वेब टीम | 14 Jun 2017 08:23 PM (IST)
नाशिक : नाशिकमध्ये गेल्या दोन तासापासून पावसानं तुफान फटकेबाजी केली आहे. यामुळे सखल भागात पाणी साचलं असून अनेक वाहनंही वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. फक्त दुचाकीच नाही तर काही चारचाकी वाहनंही वाहून गेली आहेत. तसेच या पावसाचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. सराफ बाजारात अनेक वाहने वाहून गेली असून दुकानांमध्येही पाणी घुसलं आहे. दीड तासाच्या मुसळधार पावसानेच नाशिक तुंबलं असून शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे. यामुळे महापालिकेचा मान्सूनपूर्व कामाचा दावा फोल ठरला आहे. दुसरीकडे सटाणा तालुक्यातील अंबासन,मोराणे,काकड़गाव येथे मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे शेतात सर्वत्र पाणीच् पाणी साचलं आहे.पावसाचं पाणी सखल भागातही शिरलं आहे. सटाणा, चांदवड या तालुक्यात अनेक ठिकाणीही मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे वडाळी-भोई येथून वाहणाऱ्या विनीता नदीला पूर आला आहे.