नाशिक:  एकनाथ खडसे भारतीय जनता पक्ष कधीच सोडणार नाहीत, असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.


खडसेंसाठी भाजप म्हणजे जीना यहाँ, मरना यहाँ असं आहे. पक्ष वाढवण्यासाठी एकनाथ खडसेंनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यामुळे ते पक्ष सोडणार नाहीत, असं मुनगंटीवार म्हणाले.

देशाचे पंतप्रधान जर ओबीसी आहेत तर खडसे यांच्यावर अन्याय कसा ?  एकनाथ खडसे यांच्या नाराजी संदर्भात मी त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. एकनाथ खडसे यांच्यासाठी भाजप म्हणजे 'जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहा' असं आहे, असं मुनगंटीवारांनी नमूद केलं.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे काल वृक्षलागवडीचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये दाखल आले होते. दुपारी त्यांनी वनविभाग अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी नाराज खडसेंसोबत चर्चा करणार असल्याचं सांगत भुजबळ यांनी माझा कट्टयावर केलेल्या बाळासाहेबांच्या अटकेच्या फाईलवरील सहीच्या वक्तव्याचाही खरपूस सामाचार घेतला.

बाळासाहेबांच्या फाईलवर सही करताना भुजबळांनी विचार करायचा होता : मुनगंटीवार 

युतीच्या काळात अशी कोणतीही फाईल तयार झालेली असेल, एखाद्या विभागाने फाईल तयार केलेली असेल, तर कोणत्याही फाईलवर सही करतांना भुजबळ यांनी आपल्या सदसद विवेकबुद्धीचा वापर करून सही करायला हवी होती. युतीच्या काळात अशी फाईल तयार झालेलीच नसेल. कोणत्याही मंत्र्याला आपण डोळे झाकून सही केली असं म्हणण्याचा अधिकार नाही, असं मुनगंटीवार म्हणाले.

भुजबळ काय म्हणाले होते?

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेच्या आदेशाची फाईल आपल्या कार्यकाळात नव्हे, तर आधीच्या सरकारच्या कार्यकाळात तयार झाली होती, असा गौप्यस्फोट राज्याचे माजी गृहमंत्री छगन भुजबळ यांनी माझा कट्ट्यावर केला.

श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालावर आपण केवळ सही केल्याचं भुजबळांनी यावेळी स्पष्ट केलं. छगन भुजबळ यांनी या विधानाद्वारे बाळासाहेबांची अटक ही युती सरकारच्या काळात तयार करण्यात आलेल्या फाईलमुळे झाल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित केलं.

संबंधित बातम्या 

बाळासाहेबांच्या अटकेची फाईल माझ्या अगोदरच तयार झाली होती : भुजबळ