नाशिक: नाशिकमध्ये पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. पुराची ओळख असलेला दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलं आहे.

काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे.

इतकंच नाही तर शहरातील गटारी आणि नाल्यांचे पाणीही थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे  महापालिकेची पावसाळी आणि भुयारी गटारी योजनेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.



पूरपरिस्थिती उद्भवल्याने स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांची तारांबळ उडाली आहे. रामकुंड आणि नदीकिनारी पाण्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

मागील वर्षीही अशाचप्रकारे पुराने नाशिकला घेरलं होतं.  दरम्यान, नाशिकमधील गंगापूर धरणातील पाणीसाठी 44 टक्क्यांवर आला आहे.



24 तासात 46 टन प्लॅस्टिक पिशव्या

नाशिकमध्ये गेल्या महिन्यातही पावसाने कहर केला होता. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं होतं. मात्र रस्त्यावर आलेल्या या पाण्यासाठी प्लॅस्टिक पिशव्या जबाबदार असल्याचं त्यावेळी दिसून आलं होतं.

कारण नाशिक महापालिकेने गेल्या महिन्यात 24 तासात ड्रेनेजमधून तब्बल 46 टन प्लॅस्टिक कचरा गोळा केला होता. या प्लॅस्टिक कचऱ्यामुळेच ड्रेनेज, नाले तुंबले आणि पूरस्थिती भयानक झाल्याचा दावा केला जात होता.

पावसाळ्यापूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व कामांचा डांगोरा पिटणाऱ्या महापालिकेवर सर्वत्र टीकेची झोड उठली होती. मात्र पावसानंतरच्या 24 तासांत नालेसफाई करताना महापालिकेने ड्रेनेज, नाले, ओढ्यांमध्ये अडकलेला तब्बल 46 टन कचरा गोळा केला.