नाशिक : राष्ट्रीय रोईंगपटू आणि लष्कराचा जवान दत्तू भोकनळविरोधात फसवणूक तसंच शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर त्याच्याविरोधात आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे.
महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, "2015 मध्ये दत्तूला आर्मीमध्ये मेडल मिळाल्याने चांदवडमध्ये गावकऱ्यांनी त्याचा सत्कार ठेवला होता. तेव्हा त्याची आणि माझी ओळख होऊन मैत्री झाली. काही दिवसांनी मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही दोघांनी डिसेंबर 2017 मध्ये पुण्याच्या आळंदीला जाऊन एका कार्यालयात हिंदू पद्धतीने लग्न केलं. मात्र याबाबत कुठेही वाच्यता न करता काही दिवसांनी दोघांकडच्या नातेवाईकांसमक्ष गावी लग्न करायचं आम्ही ठरवलं.
मात्र त्यानंतर आम्ही लग्न करणार असं आमच्या घरी सांगितलं. दोन वेळा लग्नाची तारीख ठरवून कार्यालय बुक करुनही, दत्तूने ऐनवेळी नकार दिला. त्याने मला 22 डिसेंबर 2017 ते 3 मार्च 2019 या काळात शारीरिक आणि मानसिक त्रास देत माझी फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे लग्नाबाबत विचारल्यास मी विष पिऊन आत्महत्या करेन, अशी धमकीही दत्तूने मला दिली."
या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली असून दत्तू आणि त्यांच्या वकिलांनी या प्रकाराबाबत कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. ही सर्व तक्रार खोटी असून या महिलेचे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत. आम्ही आमची बाजू न्यायालयात मांडू असंही त्यांनी सांगितलं.
कोण आहे दत्तू भोकनळ?
- दत्तू भोकनळ हा मूळचा नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव-रोही या गावचा आहे.
- सैन्यात भरती झाल्यावर त्याने रोईंगला सुरुवात केली
- रोईंगमध्ये प्राविण्य मिळवत 2016 चं रिओ ऑलिम्पिक गाठलं
- रिओ ऑलिम्पिकमध्ये दत्तूने रोईंगच्या सिंगल स्कल्स प्रकारात गटात 6 मिनिटं आणि 54.96 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून तेरावं स्थान मिळवलं होतं.
- ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा दत्तू महाराष्ट्रातला पहिलाच रोईंगपटू ठरला.
- दत्तू भोकनळचा समावेश असलेल्या भारताच्या रोईंग चमूने 18व्या एशियाड गेम्समधील पुरुषांच्या कॉड्रापल स्कल्स प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली.
संबंधित बातम्या :
ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ बारावीत पास!
रोईंगपटू दत्तू भोकनळची गावात जंगी मिरवणूक
रिओ ऑलिम्पिक: रोईंगपटू दत्तू भोकनळ पदकाच्या शर्यतीतून बाहेर
Asian Games 2018 : पुरुषांच्या रोईंग कॉड्रापल स्कल्समध्ये सुवर्ण
रोईंगपटू दत्तू भोकनळविरोधात महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 May 2019 12:03 PM (IST)
रिओ ऑलिम्पिकमध्ये दत्तू भोकनळने रोईंगच्या सिंगल स्कल्स प्रकारात गटात 6 मिनिटं आणि 54.96 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून तेरावं स्थान मिळवलं होतं. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा दत्तू महाराष्ट्रातला पहिलाच रोईंगपटू ठरला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -