नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान शेतकऱ्यांचा गोंधळ
एबीपी माझा वेब टीम | 30 Jul 2017 03:50 PM (IST)
लासलगावमधल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव देण्याची मागणी केली आहे. कोल्ड स्टोरेजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होतं. त्यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली.
नाशिक : लासलगावमधल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरसकट कर्जमाफी आणि हमीभाव देण्याची मागणी केली आहे. कोल्ड स्टोरेजच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होतं. त्यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर आहेत. लासलगावमध्ये मुख्यमंत्री शेतकऱ्यांना संबोधित करत असताना काही शेतकरी उठले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करायला सुरूवात केली. मुख्यमंत्र्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांना खडे बोल सुनावत खाली बसण्याची विनंती केली. मात्र शेतकऱ्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली. घोषणाबाजी करणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज दडपण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना टाळ्या वाजवण्याचं आवाहन केलं. जेव्हा हा सगळा प्रकार घडला, त्यावेळी व्यासपीठावर रेल्वेमंत्री सुरेक्ष प्रभू, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, तसंच गिरीश महाजन आणि जयकुमार रावलही उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस आज नाशिक दौऱ्यावर असताना शिवडे गावातील शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्ताने समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी पत्र लिहिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यात विरोधाचे सूर उमटले आहेत.