नाशिक : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण लागताना दिसत आहे. नाशिक जिल्ह्यात दळवटला शनिवारी संध्याकाळी टोमॅटोच्या तर रात्री कांद्याच्या ट्रकमधून सर्व माल रस्त्यावर फेकण्यात आला.  200 ते 300 लोकांचा जमाव हिंसक झाल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पांडनेला शेतकऱ्यांनी माल अडवल्यानं वातावरण तापलं.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी दळवटला हवेत गोळीबार,  तर पांडनेला लाठीचार्ज केला आहे.


नाशिकचे पोलिस जिल्हाप्रमुख अंकुशराव शिंदे दळवट मध्ये दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. दळवट फाट्यावर कांद्याचा ट्रक अडवून शेतकऱ्यांनी कांदा रस्त्यावर फेकला, तर अभोणा पोलिसांच्या गाडीवर दगड फेकही केली. परिस्थिती वर नियंत्रण करण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला मात्र परिस्थिती नियंत्रित येत नसल्याने हवेत गोळीबार करण्यात आला.

दरम्यान आंदोलन करणाऱ्या दीडशे शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस बंदोबस्तात शहरासाठी 11 दुधाचे टँकर, 194 ट्रक भाजीपाला मुंबईला रवाना करण्यात आला आहे. कायदा हातात घेतल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गिरीष महाजन सध्या नाशिकमध्येच तळ ठोकून आहेत. मात्र आंदोलक नेत्यांनी पालकमंत्र्यांशी चर्चेस नकार दिला आहे. नाशिकमध्ये सिडकोत पोलीस बंदोबस्तात भाजी बाजार सुरू करण्यात आला आहे. तर सिन्नर, देवळालीत आज बंद ठेवण्यात आला आहे. आठवडी बाजारही रद्द करण्यात आले आहेत. रविवारी दुपारी 4 वाजताच्या शेतकरी नेत्यांच्या बैठकीकडे राज्याच लक्ष लागलं आहे.