मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधरच्या मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे. यावर्षी कोकण पदवीधर निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. कारण, गद्दाराला धडा शिकवा या त्वेषाने राष्ट्रवादी मैदानात उतरली आहे.


विधान परिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत असताना सगळ्यात चुरशीची असलेली निवडणूक म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघांची निवडणूक. राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची गोची झाली. त्यामुळे गद्दाराला धडा शिकवा या भावनेने राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईत सभा घेतली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरंजन डावखरे यांना पक्षात आणल्याने भाजपसाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शिवसेनाही या निवडणुकीत तयारीनिशी उतरली आहे.

कोकण पदवीधरसाठी पक्ष आणि उमेदवार

भाजप : निरंजन डावखरे

राष्ट्रवादी काँग्रेस : नजीब मुल्ला

शिवसेना : संजय मोरे

एकूण मतदार : एक लाख चार हजार

ठाणे : 45 हजार

पालघर : 16 हजार

सिंधुदुर्ग : 5308

रत्नागिरी : 16 हजार

रायगड : 19 हजार

गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीमुळे भाजपच्या उमेदवाराला पाडून राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे निवडून आले होते. यावेळी शिवसेना आणि भाजप दोन्ही उमेदवार रिंगणात आहे. निरंजन डावखरे बाहेरुन पक्षात आल्यावर मिळालेल्या उमेदवारीमुळे भाजप पक्षात नाराजी आहे. राष्ट्रवादीला तयारीला वेळ मिळाला नाही. तरी कोकण पदवीधरमध्ये गद्दाराला धडा शिकवायचा या भावनेने राष्ट्रवादी उतरली आहे. त्यामुळे निरंजन डावखरेंसमोर आव्हान आहे.

भाजपचा उमेदवार येऊ द्यायचा नाही यासाठी कोणती समीकरणं जुळतील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन क्रमांकाची पसंतीची मतं कुणाला मिळणार यावर या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांची मैत्रीही सर्वश्रूत आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक

कोकणसोबतच मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूकही उद्या होत आहे. यावर्षी शिवसेना, भाजप आणि इतर पक्षाने ताकद पणाला लावल्यामुळे या निवडणुकाही चुरशीच्या झाल्या आहेत. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील इतर सर्वच मंत्र्यांनी या निवडणुकीसाठी मेहनत घेतली आहे.

मुंबई पदवीधर मतदार संघ - पक्ष आणि उमेदवार

भाजप : अॅड. अमितकुमार मेहता

शिवसेना : विलास पोतनीस

लोकभारती : जालिंदर सरोदे

अपक्ष ( मनसे स्वाभिमानी पुरस्कृत) : राजू बंडगर

अपक्ष : डॉ. दीपक पवार

एकूण मतदार : 70 हजार

मुंबई उपनगर : 52 हजार मतदार

शहर : 18 हजार मतदार

गेल्यावेळी शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत याच मतदारसंघातून 13 हजार मतांनी निवडून आले होते. दीपक सावंत हे युतीचे मतदार होते. पण यावेळी शिवसेना आणि भाजप दोघांनी आपले स्वतंत्र उमेदवार उतरवले आहेत. आधी आदित्य ठाकरे यांनी तरुण उमेदवार देऊ अशी घोषणा केली होती आणि ज्येष्ठ शिवसैनिक विलास पोतनीस यांना नंतर संधी दिली. यावरुन नारायण राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाने टीका केली.

मुंबई शिक्षक मतदारसंघ

मुंबई शिक्षक मतदारसंघ हा गड लोकभारतीचे कपिल पाटील यांनी राखून ठेवला आहे. यावर्षी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप ताकद लावत आहेत. शिवसेनेने या निवडणुकीसाठी पाकिटं वाटल्याचा तसेच बंगल्यावर बोलवून शाळा संस्थाचालकांची बैठक घेतल्याचा आरोप केला कपिल पाटील यांनी केला होता.

मुंबई शिक्षक मतदारसंघ : पक्ष आणि उमेदवार

शिवसेना : शिवाजी शेंडगे

लोकभारती : कपिल पाटील

अपक्ष (भाजप पुरस्कृत) : अनिल देशमुख

एकूण मतदार : 10 हजार 169

मुंबई उपनगर : 8273

मुंबई शहर : 1896

विधानपरिषदेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. पण याही निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घातल्यामुळे सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे लागून आहे. शिवाय नाशिक शिक्षक मतदारसंघासाठीही उद्याच निवडणूक होत आहे. या निवडणुकीचा निकाल 28 जूनला जाहीर होईल.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे विद्यामन आमदार

नाशिक शिक्षक मतदारसंघ : डॉ. अपूर्व हिरे

मुंबई शिक्षक मतदारसंघ : कपिल पाटील

मुंबई पदवीधर मतदारसंघ : डॉ. दीपक सावंत

कोकण पदवीधर मतदारसंघ : निरंजन डावखरे