नाशिक : भ्रष्टाचाराचे एका मागोमाग एक आरोप आणि चौकशांमुळे बेजार झालेले भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी सायंकाळी नाशिकमधल्या लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजेरी लावली. गोपनीय तक्रारीच्या चौकशीचा भाग म्हणुन खडसेंना बोलावण्यात आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


एकनाथ खडसे सव्वा तास लाचलुचपत विभागाचे अधिक्षक पंजाबराव उगले यांच्या केबिनमध्ये होते. यावेळी लाचलुचपत विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनाही प्रवेश देण्यात आलेला नव्हता.

खडसेंवर पुणे, जळगाव सह अनेक ठिकाणच्या भ्रष्टाचाराचे आरोप सातत्यानं केले गेले आहेत. यातल्या एखाद्या चौकशीसाठी खडसेंना बोलावण्यात आल्याचं बोललं जातं आहे.

सायंकाळी पाच वाजता खडसे लाचलुचपत विभागाच्या कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी चित्रीकरणासाठी आलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींजवळही खडसेंनी आपली नाराजी उपरोधिक शब्दांत व्यक्त केली. माझे मोठे आणि चांगले फोटो घ्या असं सांगत खडसे माध्यमांशी न बोलताच निघून गेले.

खडसेंच्या या गोपनीय चौकशीचं कारण नेमकं काय यावरुन चर्चांना उधाण आलं होतं.

सत्तापद गेल की पक्ष कार्यकर्ते नेते कशी पाठ फिरवतात हे यावेळी पाहायला मिळालं. कधीकाळी खडसे नाशिकमध्ये आले तर त्यांच्या मागेपुढे फिरणारा एकही नाशिकमधला नेता, कार्य़कर्ता यावेळी खडसेंसोबत नव्हता हे विशेष. खडसेंसोबत दिसलो तर पालकमंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांची नाराजी नको यामुळे अनेकांनी खडसेंना पाठ दाखवल्याचं बोललं जातं आहे.