नाशिक : डीजे बंदीचा कोर्टाचा आदेश धुडकावल्याप्रकरणी नाशिकचे भाजपा आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. आमदार सानप यांच्या स्वागत कक्षाजवळ गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे वाजवल्याची आणि ध्वनी प्रदुषणाची मर्यादा ओलांडल्याचं काल समोर आलं होतं.
त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करुन, यात तथ्य असल्यास सानप यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही नाशिक पोलिस आणि मंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. दरम्यान, काल सानप यांच्या स्वागत कक्षाबाहेर हाणामारीची घटनाही झाली होती. त्याप्रकरणी 8 ते 10 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळासाहेब सानपांच्या तपोवन मित्र मंडळाने गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत काल डीजेचा दणदणाट केला होता. हायकोर्टच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात डीजे किंवा डॉल्बी लावण्यावर बंदी आहे. मात्र मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेले नाशिक पूर्वमधील भाजप आमदार आणि शहराध्यक्ष सानप यांनी कोर्टाचा आदेश धुडकावून लावला.
नाशकातील तपोवन परिसरात असलेल्या बाळासाहेब सानप यांच्या तपोवन मित्र मंडळातर्फे डीजे साऊंड सिस्टम लावण्यात आली होती. नाशिकमधील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळातर्फे डीजेबंदीच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं.
मात्र सानपांच्या गणेश मंडळात मोठमोठ्या आवाजात डीजे लावला होता. विशेष म्हणजे सानप यांचे सुपुत्र, भाजप नगरसेवक मच्छिंद्र सानप स्वतः डीजेच्या तालावर थिरकले. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
दुसरीकडे, प्रदूषण रोखण्यासाठी नाशिकमध्ये गुलालाचा वापर टाळण्यात आला होता, मात्र तपोवन मित्र मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाची उधळणही केली.
संबंधित बातमी