नाशिक : नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात बिलाच्या मुद्द्यावरुन वाद झाला. त्यानंतर रुग्णाचे नातेवाईक आणि आम आदमी पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांनी रुग्णालयात जाऊन अंगावरील कपडे काढत आंदोलन केलं. तसंच या संपूर्ण प्रकरणाचं फेसबुक लाईव्ह केल्याने याची नाशिकमध्ये एकच चर्चा रंगली आहे. 


नाशिकमधील एका खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णाचे नातेवाईक आणि प्रशासन यांच्यात बिलाच्या मुद्द्यावरुन वाद झाला होता. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकाने नाशिकमधील आम आदमी पक्षाचे नेते जितेंद्र भावे यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर जितेंद्र भावे आणि संबंधित नातेवाईकाने काल (25 मे) दुपारी रुग्णालयात जात आपल्या अंगावरील कपडे काढत अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केलं. तसंच या संपूर्ण प्रकरणाचं भावे यांनी फेसबुक लाईव्ह देखील केलं.



या घटनेबाबत रुग्णालय प्रशासनाने जितेंद्र भावे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. यानंतर सुरुवातीला मुंबई नाका पोलिसांनी भावे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर जितेंद्र भावे यांच्या समर्थकांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी त्यांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली. तर सोशल मीडियावर देखील जितेंद्र भावे यांच्या अटकेचा निषेध केला जात आहे.


वर्षभरापासून जितेंद्र भावेंकडून लूटणाऱ्या रुग्णालयांचं वास्तव समोर


गेल्या काही दिवसांपासून अवाजवी बिल आकारणाऱ्या नाशिकमधील खाजगी रुग्णालयांविरोधात जितेंद्र भावे आवाज उठवत आहेत. जितेंद्र भावे वर्षभर सातत्याने लूट करणाऱ्या दवाखान्याचे वास्तव फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समोर मांडत आहेत. रुग्णालयात झोपून असलेल्या रुग्णाच्या जेवणाचे बिल लावणे, नऊ रुपयाचे ग्लोव्हज 67 रुपयांना आणि अशी अनेक प्रकरणं  जितेंद्र भावे यांनी पुढे आणली आहेत.