नाशिक : पाच दिवसांचं मृत अर्भक रुग्णालयाच्या परिसरात आढळल्याची घटना नाशिक शासकीय रुग्णालयाजवळ घडली आहे. धक्कादायक म्हणजे रुग्णालयाच्या आवारातून कुत्र्याने अर्भक उचलून आणल्याने हा प्रकार उघडकीस आला.
नातेवाईकांनी या अर्भकाला प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून रुग्णालयाच्या परिसरातच टाकून दिलं. पाचव्या दिवशी या अर्भकाला कुत्र्याने भक्ष्य केलं. कुत्र्याने ही पिशवी फरफटत पोलीस चौकीजवळ आणल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आणि मग चौकशी सुरु झाली.
25 सप्टेंबरला इगतपुरी तालुक्यातील आदिवासी महिलेची प्रसूती झाली. प्रसूती दरम्यान बाळ दगावलं. त्यानंतर मृत बाळाला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं. मात्र नातेवाईकांनी बाळावर अंत्यविधी न करता रुग्णालयाच्याच आवारात फेकून दिलं.
अज्ञात व्यक्तींनी अंत्यविधी करू नका अर्भक इथेच फेकून द्या, असं धमकावल्याने रुग्णालयाच्या आवारातच बाळ टाकून दिलं, असं नातेवाईकांचं म्हणणं आहे.
रुग्णालय प्रशासनाने यातून अंग काढून घेतलंय. मृत्यूनंतर अर्भकाचा पुढचा विधी करणं ही सर्वस्वी नातेवाईकांची जबाबदारी असल्याचं स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.
शेकडोंच्या संख्येने अधिकारी-कर्मचारी, सुरक्षा रक्षकांची वर्दळ असताना पाच दिवस अर्भक कोणालाच कसं दिसलं नाही याचं उत्तर प्रशासनाकडे नाही. आदिवासी कुटुंबाच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत अंधश्रद्धेतून हा प्रकार घडला असण्याची शक्यता खुद्द रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली आहे.
पोलिसांनी आज पंचनामा केला असून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. रुग्णालय प्रशासनाने आधीच हात वर केल्याने हाती काय लागतं याकडे लक्ष लागलं आहे.
मृत अर्भक रुग्णालय परिसरातच फेकलं, कुत्र्याने पिशवी उचलून आणल्याने घटना समोर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2018 03:25 PM (IST)
पाचव्या दिवशी या अर्भकाला कुत्र्याने भक्ष्य केलं. कुत्र्याने ही पिशवी फरफटत पोलीस चौकीजवळ आणल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आणि मग चौकशी सुरु झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -