नाशिक : फटाके उडवण्यास सुप्रीम कोर्टाने रात्री आठ ते दहा असे दोनच तास परवानगी दिली आहे. उर्वरित 22 तास म्हणजेच रात्री दहा ते दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजेपर्यंत फटाके उडवल्यास आठ दिवस कारावास होऊ शकतो. त्याशिवाय 1250 रुपयांहून जास्त दंड आकारला जाऊ शकतो, अशी माहिती नाशिक पोलिस आयुक्तांनी दिली.


फटाक्यांच्या आवाजावर 125 डेसिबलपर्यंत मर्यादा आहे. नाशिक शहरात पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी दोन नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

फटाके विक्रेत्यांना पोलिसांनी नियम आखून दिले आहेत. प्रत्येक फटाक्याच्या दुकानात 100 किलो फटाके आणि 500 किलो शोभेच्या फटाक्यांपेक्षा जास्तीचा साठा नसावा. दुकानात मेणबत्ती किंवा तेलाचा दिवा लावू नये, अशा सूचना आहेत.

फटाके विक्रेत्यांसाठी नियम

- फटाके हाताळण्यासाठी पुरेशी जागा असावी आणि दुकानात ग्राहकांची गर्दी होऊ नये, याची काळजी घ्यावी
- फटाक्याची लड दहा हजारपेक्षा जास्त लांबीची असू नये
- अॅटमबॉम्ब, तडतडी, बटरफ्लाय, चिडचिडीया, मल्टिलिक्स या फटाक्यांची विक्री करु नये
- चिनी तसेच परदेशी फटाके वापरु नये किंवा विक्री करु नये
- शांतता प्रभाग तसेच शैक्षणिक संस्था, पेट्रोल पंपाजवळ फटक्यांचा वापर टाळावा