नाशिक : लसीकरणाच्या नावाखाली नाशिक शहरात नगरसेवकांची चमकोगिरी सुरू आहे. एकीकडे नागरिकांना लस उपलब्ध होत नाही तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे, तर दुसरीकडे मोफत लसीकरणाचे अनधिकृत होर्डिंग्ज शहरभर लावले जात आहे. लोकप्रतिनिच्या चमकोगिरीमुळे शहर विद्रुपीकरणात भर पडत आहे.
नाशिक शहरात जवळपास प्रत्येक प्रभागात बहुताश नगरसेवकांनी लवलेले होर्डिंग्स नागरिकंचा मनस्ताप अधिकच वाढवत आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या लशीचे मनपा प्रशासनाकडून मोफत वितरण केले जात आहे. महापालिकेच्या केंद्रावर नागरिकांचे लसीकरण केले जाते आहे. या शृंखलेत नगरसेवकांचा थेट सबंध कुठेच बघायला मिळत नाही. मनपाचे डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लसीकरण केलं जात आहे. प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या आहेत. आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी लसीकरण केंद्राबाहेर आणि वार्डात फलकबाजी करण्यास सुरुवात केली.
महापालिकेकडून मनपाच्या केंद्रावर मोफत लसीकरण पहिल्या दिवसापासून केले जात आहे. मात्र आता नगरसेवक इथेही श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नाशिक महानगरपालिकाची निवडणूक 8 ते 9 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत स्वतःचे नाव पोहोचवण्यासाठी नगरसेवकामध्ये अक्षरशः स्पर्धा लागली आहे. सर्वच स्तरातून चमकोगिरीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. लोकांना तीन-तीन तास रांगेत उभे रहावे लागत आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवस उलटून गेलेत तरीही दुसरा डोस मिळत नाही. आधी लसीकरण सुरळीत करा आणि नंतर स्वतःचे मार्केटिंग करा, असा सल्ला नागरिकांनी नगरसेवकांना दिलाय. तर, केंद्र सरकारकडून येणाऱ्या लसींचा साठ्यात नगरसेवकांचे योगदान काय असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.
नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांनीही शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या या फलकबाजीला चाप लावला आहे. लोकप्रतिनिधी यांनी अनधिकृत होर्डिंग्ज लावणे योग्य नाही, सुरुवातीला त्यांना होर्डिंग्ज काढण्याच्या सूचना दिल्या जातील, त्यानंतरही ऐकले नाही तर कायदेशीर कारवाईचा इशारा जाधव यांनी दिलाय. त्याच बरोबर अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याच्या सूचना दिल्यानंतर अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना दणका द्यायला सुरुवात झालीय.
या आधीही मनपा आरोग्य विभागाच्या माध्यमातून रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात होती. त्या कामातही नगरसेवक लुडबूड करत स्वतः क्रेडिट घेत होते. आता पुन्हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चमकोगिरी सुरू झाल्याने शहरात नगरसेवकांच्या कामापेक्षा होर्डिंग्जची चर्चा अधिक होत आहे.
नाशिक शहरातील लसीकरणाची सध्याची स्थिती
- एकूण लसीकरण- 4,94,747
- पहिला डोस- 3,77,604
- दुसरा डोस- 1, 17,143
नाशिक जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची सध्याची स्थिति
नाशिक शहरात सध्या 733 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून जिल्ह्यात एकूण 1779 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 8420 एवढी आहे.