नाशिक : नाशिकमध्ये ट्रकखाली झोपलेल्या क्लिनरचा चाकाखाली चिरडून मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी नाशिकच्या इंदिरानगर परिसरात ही घटना घडली आहे. या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर फरार झाला आहे.

नाशिक-पाथर्डी रोडवरील बिर्ला सिमेंट गोडाऊनला काल दुपारी राजस्थानहून नाशिकला सिमेंटच्या गोण्या घेऊन हा ट्रक आला होता. राजस्थानहून आलेल्या श्रीराम चौधरी नामक ट्रक ड्रायव्हरने या गोड़ाऊन समोर ट्रक उभा करुन तो ड्रायव्हर सीट वरच झोपी गेला होता. ट्रकमध्ये झोपण्यास जागा नसल्यानं क्लिनर महेंदर भाट हा ट्रक खाली मध्यभागी जाऊन झोपला होता. दरम्यान संध्याकाळी ड्रायव्हरला जाग येताच त्याने ट्रक चालु करून मागे घेतला.

ड्रायव्हरनं ट्रक मागे घेताच महेंदर हा पुढच्या चाकाखाली दाबला गेला आणि यात त्याच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. यात जागीच त्याचा मृत्यू झाला. आपली चूक लक्षात येताच ट्रक ड्रायव्हर श्रीराम हा फरार झाला, त्याच्यावर इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहेत.