नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भुजबळ समर्थकांच्या अनेक सुरस कथा चर्चेत आल्या आहेत. भुजबळांच्या अटकेपासून दाढी न करणारा एक कार्यकर्ता नाशकात पाहायला मिळत आहे.
येवला तालुक्यातील अंदरसुलचे सुनील पैठणकर भुजबळांचे खंदे समर्थक. छगन भुजबळ यांना 14 मार्च 2016 रोजी अटक झाली. त्या दिवसापासून पैठणकरांनी दाढी केलेली नाही. सुनील पैठणकर हे शेतकरी आहेत.
भुजबळ यांच्यावर अन्याय झाला, त्याची आठवण कायम राहावी यासाठी या सुनील पैठणकर यांनी दाढीच केली नाही. जोपर्यंत भुजबळ कारागृहातुन बाहेर येणार नाहीत, तोपर्यंत दाढी न करण्याचा पण त्यांनी केला होता.
सोमवारी भुजबळ यांची भेट ते घेणार आहेत. सर्व भुजबळ समर्थकांना गोडधोड जेवू घालून छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आपली दाढी करण्याचा महासोहळा आखण्याचा पैठणकरांचा मानस आहे.
भुजबळ कुटुंबीयांचं आवाहन
कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम करु नये, किंवा मुंबईत येण्याची घाई करु नये, असं आवाहन भुजबळ कुटुंबीयांकडून करण्यात आलं आहे. भुजबळ साहेब भेटण्यासाठी नंतर वेळ देतील, मात्र आत्ताच घाई करु नये, असं भुजबळ कुटुंबीयांनी म्हटलं आहे.
छगन भुजबळ सोमवारपासून पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहेत. मुंबईतल्या केईएम रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी भुजबळांची भेट घेत आहेत.
जामिनानंतर भुजबळ सध्या केईएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना स्वादूपिंडाचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.