नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत आज राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार आणि काँग्रेसच्या नगरसेविका हेमलता पाटील यांच्यात मोठी खडाजंगी झाली. टक्केवारी, दुकानदारीच्या आरोपांनी आणि अभूतपूर्व गोंधळाने आजची महासभा गाजली. महासभेत निर्णय एक होतो आणि वृत्तात त्याची वेगळी नोंद होते, त्यामुळे विरोधकांनी आक्षेप घेत इतिवृत वाचनाची मागणी केली.
सत्ताधारी भाजपने ज्यादा विषय मंजूर केल्यान गोंधळाला सुरवात झाली. काही नगरसेवक राजदंडाकडे धाव घेऊ लागल्यानं महापौरांनी घाईघाईत महासभा गुंडाळून टाकली. महासभेत नागरिकांच्या इतर विषयावर चर्चा करण्याची महासभा सुरु करण्याची मागणी काही नगरसेवक करत होते. मात्र राष्ट्रगीताने सभा संपविण्यात आली.
काँग्रेसच्या नगरसेविका हेमलता पाटील यांनी सभा मॅनेज झाल्याचा आरोप करत गजानन शेलार यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर शेलार आणि पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. एकमेकांवर टक्केवारी घेण्याचे दुकानदारी करण्याचे आरोप करत वाद खालच्या पातळीवर गेल्याचं महासभेत पाहायला मिळालं.
महापालिकेच्या वतीने बससेवा चालवण्यास विरोधाकांचा विरोध कायम आहे. बससेवा मनपाने चालवावी यासाठी मुख्यमंत्री आग्रही असल्यानं सत्तधारी भाजपने बहुमताच्या जोरावर परिवहन सेवा सुरु करण्याच्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. लोकप्रतिनिधीचा परिवहन सेवेवर अंकुश रहावा यासाठी मागील महासभेत परिवहन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात मात्र समिती स्थापन झाल्यानं विरोधकांनी आक्षेप घेतला आणि त्यातून वादाला सुरवात झाली.