पुणे : 94 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन नाशिकला घ्यायचं की दिल्लीला घ्यायचं यावरून साहित्य विश्वात वेगवेगळी मतं व्यक्त होत आहेत. कविवर्य कुसुमाग्रजांची कर्मभूमी असलेल्या नाशिकला या संमेलनाचा मान मिळणार की देशाच्या राजधानीत हे संमेलन भरवलं जाणार याचा निर्णय आठ जानेवारीला औरंगाबादला होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत होणार आहे. त्याआधी महामंडळाचं एक पथक सात जानेवारीला नाशिकला जाऊन नाशिकच्या स्थळाची पाहणी देखील करणार आहे.


अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटलं की वाद हा आलाच. पण यावेळी संमेलन कुठं घ्यायचं यावरून आधीच वादाला सुरुवात झालीय. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर आवश्यक खबरदारी घेऊन हे संमेलन कुठं घेता येईल यावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत आठ जानेवारीला निर्णय होणार आहे. मागील वर्षी लोकडाऊनमुळे साहित्य संमेलन होऊ शकलं नाही. त्या न झालेल्या संमेलनासाठी सरहद संस्थेने दिल्लीमध्ये संमेलन घेण्याचा प्रस्ताव दिला होता.


दिल्लीत संमेलन घेण्याची सरहद संस्थेची मागणी
खरं तर त्याच्या मागील वर्षी देखील सरहद संस्थेने दिल्लीत साहित्य संमेलन घेण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, 2018 सालचं साहित्य संम्मेलन उस्मानाबादला घेण्याचा निर्णय साहित्य महामंडळाने घेतला होता. त्यामुळं दोन वर्ष हुकलेली संधी आतातरी आपल्याला मिळावी अशी सरहद संस्थेची मागणी आहे. सरहद संस्थेला पंजाबमधील घुमानमध्ये साहित्य संमेलन भरवण्याचा अनुभव देखील आहे. त्या बळावर मराठीची पताका देशाच्या राजधानीत फडकवण्यास आपण तयार असल्याचा दावा सरहद संस्थेने केलाय.


नाशिकमध्ये संमेलन घेण्यासाठी लोकहितवादी संस्थाही आग्रही
दुसरीकडे कविवर्य कुसुमाग्रजानी स्थापन केलेली लोकहितवादी संस्थाही नाशिकमध्ये हे संमेलन घेण्यासाठी इच्छुक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार हेमंत टकले हे या संस्थेचे विश्वस्त असून त्यांनी कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत हे आंदोलन व्हावं अशी मागणी केली आहे.


परभणीतील सेलू आणि जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरहून देखील आमंत्रणं..


खरं तर या 94व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी परभणीतील सेलू आणि जळगाव जिल्ह्यातील अंमळनेरहून देखील आमंत्रणं आली होती. परंतु, नंतर या दोन्ही शहरांनी स्पर्धेतून काढता पाय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सहस्त्रचंद्र दर्शनाचा सोहळा हेमंत टकले आणि नाशिकचे पालकमंत्री असलेल्या छगन भुजबळांना साहित्य संमेलनात घडवून आणायचा असल्याने या दोन शहरांना रीतसर माघार घ्यायला लावल्याचंही बोललं गेलं. अर्थात साहित्य मंडळाने त्याचा इन्कार केला आहे.


मात्र, या आरोपाला फेटाळणाऱ्या साहित्य महामंडळाचा नाशिककडे असलेला कल लपून राहिला नाही. त्यामुळेच गुरुवारी सात जानेवारीला नाशिकला भेट दिल्यानंतर महामंडळाची टीम लगेच आठ तारखेला संमेलनाचं ठिकाण निश्चित करणार आहे. मात्र, या सगळ्या वादात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल ही अपेक्षा.