Nashik: नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाची तब्बल 1 हजार 300 कोटींच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने तेराशे कोटींची कामे करणार कशी? असा प्रश्न नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागसमोर येऊन ठेपला आहे. 


तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्याचबरोबर दोन वर्षे कोरोनाचा काळ असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळणाऱ्या निधीला मोठा फटका बसल्याचे दिसून आले. कोरोनाचे संकट आल्याने बांधकाम विभागाचा निधी आरोग्य विभागाकडे वळवण्यात आला. कोरोनामुळे दोन वर्षे विकासकामे बंद असल्याने शिवाय इकडचा निधी आरोग्य व्यवस्थेकडे वळविण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला निधी मिळाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध कामे खोळंबल्याचे दिसून आले. 


दरम्यान कोरोनाचे संकट काहीसे कमी झाल्यानंतर विविध कामांना मंजूरी देण्यात आली. मात्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (shinde fadnavis government) येताच त्यांनी महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या कामांवर स्थगिती आणल्याने पुन्हा गोंधळाची स्थिती निर्माण झाली.  नंतरच्या काळात ही स्थगिती उठवली देखील मात्र सध्याच्या घडीला सार्वजनिक बांधकाम विभागाला निधीची चणचण असल्याचे दिसते आहे. ठेकेदारांनी केलेल्या कामांचे पैसे त्यांना मिळाले नसल्याचे चित्र आहे. अशातच सध्या जिल्ह्यात आचारसंहिता लागू असल्याने कामेही बंद असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग हातावर हात धरून बसला आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हा, राज्य महामार्ग बांधणे, रस्ते दुरुस्ती करणे, पूल बांधणे, शासकीय इमारतींचे बांधकाम, त्यांची देखभाल दुरुस्ती, उद्याने, शासकीय विश्रामगृह आदीसंबंधीत असलेली बांधकामे व त्यांची दुरुस्ती सा.बांधकाम विभागाकडून केली जाते. शासकीय इमारतीसह रस्त्यांवर मोठया प्रमाणात कोट्यावधींचा खर्च केला जातो. मागील दोन वर्षात निधी अभावी जिल्हयातील विविध कामांना फटका बसल्याचे दिसून आले. राज्यात महाविकास आघाडी काळात विकास कामे रखडल्याचा आरोप वारंवार केला जात होता. काही महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जास्तीत जास्त निधी सार्वजनिक बांधकामाला मिळ्ण्याची शक्यता आहे. मार्च मध्ये राज्याचे बजेट होणार असल्याने नाशिक सार्वजननिक बांधकाम विभागासाठी चांगला निधी मिळाला तरच जिल्हयात रस्त्यांची कामे होऊ शकतील, असे चित्र आहे. 


नाशिक जिल्हयासाठी तेरासे कोटींची कामे मंजूर असली तरी दीडशे कोटींची कामे होतील एवढाच निधी सध्या शिल्लक आहे. मार्च महिन्यात चांगला निधी मिळू शकतो, अशी आशा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी व्यक्त केली आहे.