Uddhav Thackeray नाशिक : एकीकडे अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पण (Ram Mandir Inauguration) सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. संपूर्ण देशभराचे लक्ष राम मंदिराच्या लोकार्पणाकडे लागले आहे. तर दुसरीकडे अयोध्येला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला न जाता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन (Shivsena UBT State level convention) नाशिकमध्ये (Nashik) होत आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून अधिवेशनाची जंगी तयारी केली जात आहे.
1994 नंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाचे महाअधिवेशन होणार आहे. 1994 साली नाशिकमध्ये झालेल्या अधिवेशनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 'दार उघड बये दार उघड'अशी हाक देत तुळजा भवानीचा जागर केला होता. त्या अधिवेशनंतर राज्यात 1995 साली शिवसेना भाजप युतीचे सरकार आले होते. तसेच शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला होता.
अधिवेशनाकडे देशाचे लक्ष
गेल्या 30 वर्षांमध्ये शिवसेनेत अनेक घडामोडी घडल्या. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तर त्यांनी उभी केलेली संघटना आता एकनाथ शिंदेंच्या ताब्यात आहे. भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरे इंडिया आघाडीत सहभागी झालेत या पार्श्वभूमीवर होणाऱ्या अधिवेशनाकडे राज्याचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाचे पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल
22 तारखेला आयोद्धेत राम मंदिर लोकार्पण सोहळा होत असताना नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या अधिवेशनची आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची धूम राहणार आहे. शनिवारपासून शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल होत आहेत.
उद्धव ठाकरे यांचा संभाव्य दौरा
- उद्धव ठाकरे 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता मातोश्रीहून रवाना होतील. विमानाने त्यांच्या ओझर विमानतळावर आगमन होईल.
- 1 वाजता ते ओझरहून भगूरला जाणार, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन सावरकरांना अभिवादन करणार.
- 2 वाजता भगूरहून रॅडिसन ब्ल्यू हॉटेलकडे जाणार.
- सायंकाळी 5.30 वाजता काळाराम मंदिराकडे निघणार. काळाराम मंदिरात दर्शन घेऊन पूजा करणार.
- 6.30 वाजता गोदा घाटावर येऊन गोदावरीची महाआरती करणार.
- दुसऱ्या दिवशी 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने अभिवादन करून महाअधिवेशनाला सुरुवात होणार, 10 ते 2 वाजेपर्यंत प्रमुख वक्ते बोलणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होईल.
- सायंकाळी 7 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. मात्र सुरुवातीला जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे.
आणखी वाचा