Uddhav Thackeray Godavari Aarti नाशिक : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. आगमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नाशिकमधून करण्याचा निर्धार ठाकरे गटाने केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रामकुंड येथे गोदावरीची आरती करण्यात आली.
सोमवारी दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी सायंकाळी काळाराम मंदिरात आपल्या कुटुंबासह दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते महापूजा आणि महाआरती करण्यात आली.
रामकुंडावर उद्धव ठाकरेंच्या हस्ते गोदावरीची आरती
त्यानंतर उद्धव ठाकरे हे नाशिक येथील रामकुंड परिसरात दाखल झाले. त्यांनी रामकुंडावर गोदावरीची आरती केली. यावेळी उद्धव ठाकरेंना पाहण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी कडेकोट नियोजन केले होते. उद्धव ठाकरे रामकुंडावर दाखल होताच कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आमदार आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोदाकाठावर ठाकरे गटाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. गोदाकाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे अनेक बॅनर्स लावल्याचे यावेळी दिसून आले.
गोदाकाठी रामरक्षा पठण
श्रीराम जन्मभूमी अयोध्याच्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने श्री प्रभू रामचंद्र अभिषेक पूजा, सामूहिक रामरक्षा पठण व प्राणप्रतिष्ठा मंत्रघोष गोदाकाठी करण्यात आले. देशभरामध्ये प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने उत्साह आहे. त्यात नाशिकमध्ये देखील असाच उत्साह पाहायला मिळाला.
लहान मुलांनी साकारली राम, लक्षण, सीता यांची वेशभूषा
यावेळी लहान मुलांनी राम, लक्ष्मण, सीता यांची वेशभूषा धारण केली आहे. तरुणांच्या पथकाकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादारीकरण करण्यात आले. गोदा काठावरील आरतीनंतर येथे दिवे लावण्यात आले होते.
उद्धव ठाकरेंच्या पोशाखाने वेधले सर्वांचे लक्ष
उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळाराम मंदिरात जाताना त्यांनी भगवे कपडे परिधान केले होते. तसेच त्यांनी गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. या पोशाखाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
असे आहे रामकुंडाचे महात्म्य
राम कुंड हे गोदावरी नदीवरील एक महत्त्वाचे धार्मिक कुंड आहे. हिंदू धर्मीय या कुंडास अतिशय पवित्र जागा मानतात.हिंदु धर्मानुसार येथे जर स्नान केले तर माणसास पापमुक्ती प्राप्त होते. समुद्रमंथनाच्या वेळी अमृत कलशातुन अमृताचे काही थेंब येथे पडले आणि राम कुंड पवित्र झाले अशी एक आख्यायिका आहे. हिंदू धर्मीय येथे अस्थी विसर्जन करण्यासाठी येतात. येथे जर आपल्या पुर्वजांच्या अस्थीचे विसर्जन केले तर त्या अस्थी पाण्यात विरघळतात आणि मृत आत्म्यास मोक्ष मिळतो असा समज हिंदु धर्मीयात आहे. दर बारा वर्षांनी येथे सिंहस्थ कुंभमेळा पार पाडतो. कुंभमेळ्याच्या वेळी लाखो हिंदू धर्मीय येथे जमतात आणि स्नान करून पुण्यप्राप्ती मिळवतात. यावेळी अनेक साधू संत उपस्थिती लावतात.
आणखी वाचा