Uddhav Thackeray Kalaram Mandir visit नाशिक : आगमी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन (State level convention) आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर असून दुपारी 12 वाजता नाशिकला दाखल झाले आहेत. 


उद्धव ठाकरे यांनी प्रथम भगूर येथे जात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट दिली आणि सावरकांच्या पुतळ्याला अभिवादन केले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येच्या राम मंदिरात आज आरती केली. तर उद्धव ठाकरेंनी नाशिकला काळाराम मंदिराला भेट देऊन आरती केली. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


काळाराम मंदिरात उद्धव ठाकरेंकडून महाआरती


उद्धव ठाकरे काळाराम मंदिर परिसरात दाखल होताच त्यांच्यावर कार्यकर्त्यांकडून फुलांची उधळण करण्यात आली. ते पूर्व महाद्वारातून काळाराम मंदिरात दाखल झाले. प्रथम त्यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रभू श्रीरामाचे दर्शन त्यांनी घेतले. उद्धव ठाकरेंच्या हस्ते यावेळी महापूजा आणि महाआरती करण्यात आली. काळाराम मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भगवे कपडे, गळ्यात रुद्राक्षाची माळ परिधान केली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.


40 फुटांचा हार घालत उद्धव ठाकरेंचे स्वागत


उद्धव ठाकरे हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथून काळाराम मंदिराकडे रवाना झाले. यावेळी मुंबई नाका येथे त्यांचे ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या माध्यमातून 40 फुटांचा हार त्यांनी घालण्यात आला. तसेच जेसीबीमधून फुलांची उधळण देखील करण्यात आली. 


काळाराम मंदिरात भाविकांची गर्दी


अयोध्या राम मंदिर लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील काळाराम मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काळाराम मंदिरात आकर्षक अशी द्राक्षांची सजावट करण्यात आली आहे. सकाळपासूनच भाविकांनी प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र आहे. काळाराम मंदिरात करण्यात आलेली द्राक्षांची सजावट भाविकांची लक्ष वेधून घेत आहे.


काळाराम मंदिर अर्धा तास भाविकांसाठी बंद


आज सकाळपासून काळाराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग व गर्दी आहे. उद्धव ठाकरेंच्या हस्ते महापूजा सुरू होण्यापूर्वी मंदिरात भाविकांना प्रवेश बंद करण्यात आला. महापूजा आटोपल्यानंतर भाविकांना पुन्हा देण्यात आला. साधारणपणे अर्धा तास काळाराम मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. 


आणखी वाचा 


Uddhav Thackeray: अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान; उद्धव ठाकरे म्हणाले, आज अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं!