नाशिक : सध्या सायबर फ्रॉडप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक फसवणुकीचे गुन्हे दररोज समोर येत आहेत. त्यामुळे कोण कोणाची आणि कशाप्रकारे फसवणूक करेल हे सांगता येत नाही. आतातर लसीकरणासबंधी अगदी अजबप्रकारे फसवणूक केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशकात कोरोनाच्या नावाखाली एका भामट्याने दोन वृद्ध बहिणींना 1 लाख 12 हजार रुपयांना लुटले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनामुक्त झालेल्या आणि लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरीकांना सरकारकडून प्रत्येकी 15 हजार रुपयांची मदत दिली जाते आहे, अशी बतावणी करत ही फसवणूक करण्यात आली आहे.


सोमवारी दुपारी भद्रकाली परिसरात कपडे खरेदीसाठी आलेल्या दोन वृद्ध महिलांना एका व्यक्तीने रिक्षात बसवत दोन्ही लसीचे डोस झाले असल्यास सरकार 15 हजार रुपये देणार असल्याची बतावणी करत नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर घेऊन आला. त्यानंतर त्यांचा विश्वास संपादन करत त्यांचे दागिने, पैशांची बॅग, एटीएम कार्ड असे सारे घेऊन तो फरार झाला. काही वेळाने हा प्रकार लक्षात येताच महिलांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठत तक्रार केली. त्यानंचक पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्यासही सुरुवात केली आहे. 


पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन


हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी अशाप्रकारची कुठलीही सरकारची योजना नसून नागरिकांनी सतर्क रहावे आणि अशी कोणी बतावणी करत असेल तर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे. दरम्यान सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती सरकारवाडा पोलिस ठाण्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिली आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha