नाशिक : निफाड तालुक्यात (Niphad Taluka) शेततळ्यात बुडून (Drown) दोन भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन अल्पवयीन सख्या भावांचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी हे दोन भावंड गेले होते. मात्र, तळ्यात पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकमधील (Nashik News) दहा दिवसात बुडून मृत्यू होणार्‍यांची ही चौथी घटना आहे. 


शेततळ्यात पडून दोघांचा मृत्यू


याबाबत अधिक माहिती अशी की, निफाड येथील शेतकरी गोपाल जयराम ढेपले यांची मुले प्रेम गोपाल ढेपले व प्रतिक गोपाल ढेपले हे वीजपंप सुरु करण्यासाठी शेतात गेलेले होते. दोनही मुले घरी लवकर परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यास गेलेल्या कुटुंबियांना दोनही मुले हे तळ्यातील पाण्यावर तरंगताना दिसून आले. त्यांना तात्काळ निफाड उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डाँक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे दिले सोपवण्यात येणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


भावली धरणात बुडून पाच जणांचा मृत्यू


नाशिकच्या  इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) भावली धरण (Bhavali Dam) परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पाच जणांचा धरणात बुडून (Drown) मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजता घडली. मृतांमध्ये तीन मुलींसह दोन तरुणाचा समावेश आहे. हे सर्वजण नाशिकरोड (Nashikroad) येथील गोसावीवाडीतील रहिवासी आहेत. या घटनेमुळे गोसावीवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. हनिफ शेख, अनस खान दिलदार खान (15), नाझिया इमरान खान (15), मीजबाह दिलदार खान (16) आणि ईकरा दिलदार खान (14) अशी मृतांची नावे आहेत. 


सिन्नरमध्ये बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात कुंदेवाडी (Kundewadi) या ठिकाणी देव नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी (दि. 23) दुपारी तीन वाजेच्या सुमारास आंबेडकरनगर वावी या ठिकाणी राहणारे दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू झाला. हे दोघेही सोळा वर्षीय तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.    


वैतरणा धरणात तीन जण बुडाले


इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरण परिसरात रविवार (दि. 26) रोजी मुंबई येथील 14 ते 15 जणांचा ग्रुप फिरण्यासाठी आला होता. यावेळी दुपारी हे पर्यटक धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पोहून झाल्यावर यातील मुंबई येथील मुफदल सैईफउद्दिन हरहरवाला (52) रा. सैफीक पार्क, चर्च रोड, मरळा, अंधेरी हे पाण्यात वाहुन गेले होते. तर मुंबईचाच पर्यटक असलेला सिध्देश दिलीप गुरव (23) हा देखील वैतरणा धरण परिसरातील आळवंड शिवारात पाण्यात वाहून गेला होता. तर एक जण हा वैतरणा धरण परिसरातील वावी हर्ष शिवारात बुडाला होता. या तिघांपैकी आता दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरु आहे.


आणखी वाचा