Trimbakeshwar Jyotirlinga Temple: अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे (Trimbakeshwar Jyotirlinga) संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी आठ दिवस मंदिर बंद ठेवण्यात आले होते. या दिवसांत हजारो लाखो भाविक दर्शनासाठी आले, अनेकांनी दरवाजाचे दर्शन करत माघारी फिरले. मात्र आता प्रतीक्षा संपली असून आज पासून त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड उत्साह असून आज पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळत आहे. 


त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) प्रशासनाने काही दिवसांपूर्वी दिलेल्या पत्रकानुसार 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. ज्योतिर्लिंगाचे आणि मंदिराच्या संरक्षण कामांमुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान या आठ दिवसांच्या कालावधीत मंदिर संवर्धनाचे काही देखील करण्यात आले आहे. यामुळे नेहमीप्रमाणे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नव्हते.


त्र्यंबकेश्वर मंदिरातील अध्याय ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यावर उपाययोजना म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला होता. तसेच शिवलिंगाच्या एका बाजूचा वज्रलेप निखळत असल्याचे दिसून येत होते, तर हा वज्रलेप लावून केवळ आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी देखील शिवलिंगाची झीज होत असल्याने मंदिर प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली होती. त्याच अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन आणि मंदिराची देखभाल दुरुस्तीसाठी काही दिवस मंदिर बंद ठेवण्यात आले होते. 


आठ दिवसांत शिवलिंगाचे काम...


त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगाची रचना इतर स्थानांपेक्षा काहीशी वेगळी आहे. त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. येथील शिवलिंगात ब्रह्म विष्णू महेश असे तीन उंचवटे असून या उंचवट्यावर असलेला कंगोरा ज्याला स्थानिक लोक पाळ असे म्हणतात. त्या पाळावरचे कवच देखील निघू लागले होते. त्यामुळे उपाययोजना म्हणून मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेत 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. 


आज पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी...


दरम्यान आज मंदिर खुले झाल्यापासून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक भाविक दोन ते तीन दिवसांपासून मुक्कामी होते. अखेर आज पहाटे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आल्यानंतर भाविकांनी हायसे वाटले. त्यामुळे बम बम भोले च्या गजरात आज सकाळपासून भाविक दर्शन घेत आहेत.