Nashik News : पावसाळी पर्यटनादरम्यान होणारे संभाव्य अपघात (Accident) टाळण्यासाठी नाशिक (Nashik) जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे. गर्दी होणाऱ्या पर्यटन स्थळावर (Tourist spot) जाण्यासाठी पर्यटकांना ऑनलाईन परवानगी (online permission) घ्यावी लागणार आहे. पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधिक यंत्रणांना आदेश दिले आहेत. 


गड किल्ले, धबधबे, धरण परिसरात खबरदारी घेण्याच्या सूचना


गड किल्ले, धबधबे, धरण परिसरात खबरदारी घेण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत. वन आणि पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या पर्यटन स्थळांची अ, ब, क अशी वर्गवारी करुन उपाययोजना करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या आहेत. 


धोकादायक ठिकाणी सेल्फी, फोटो काढू नये, जिल्ह्याधिकाऱ्यांचे पर्यटकांना आवाहन


पर्यटनस्थळ ज्या विभागाच्या अंतर्गत असेल त्या विभागाकडून पर्यटकांना ऑनलाईन पास घ्यावे लागणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी या तत्वावर पर्यटनस्थळी जाण्यास परवानगी देऊन गर्दीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. धोकादायक ठिकाणी सेल्फी, फोटो काढू नये, तसेच रिल्स बनवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पर्यटकांना केलं आहे. 


पर्यटनस्थळी जाताना दिलेल्या सुचनांचे पालन करावे


पावसाळा भटकंती करण्यासाठी जेवढा उत्तम तेवढाच तो अपघातांच्या दृष्टीकोनातून वाईट. पावसाळ्यात होणारे बहुतेक अपघात अतिआत्मविश्वास, परिसराचे नसलेली माहिती या गोष्टींमुळे होतात. पावसाळ्यात कुठल्याही सहलीला किंवा ट्रेकला जाताना त्या ठिकाणाची, तेथे जाणाऱ्या विविध वाटांची पूर्ण माहिती करून घेणे. जर त्या ठिकाणी पहिल्यांदाच जाणार असाल, पाऊस पडत असेल, दाट धुके आणि वादळी वाऱ्यात गावातील एखादा मार्गदर्शक घेणे कधीही चांगले. पण बऱ्याचवेळा एखाद्या ठिकाणाची माहिती मित्रांकडून किंवा नेटवरून घेतलेली असते. त्या माहितीच्याआधारे पर्यटक त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्या ठिकाणाची योग्य माहिती नसल्यामुळे वाट चुकतात, क्वचित प्रसंगी आपला जीव पण गमावून बसतात. बहुसंख्य होणारे अपघात त्या ठिकाणी असलेल्या धोक्यांची माहिती नसणे, दिलेल्या सूचनांचे पालन न करणे या गोष्टींमुळे होतात.


भटकंती करताना संयम ठेवा


पावसात भटकंती करा, पण भटकंती करत असताना स्वतःची आणि इतरांची पण काळजी घ्या. भटकंती करताना संयम ठेवा. भटकंती करताना मला सर्व माहिती आहे, हा अतिआत्मउत्साह दाखवू नका, विशेषतः पाण्याच्या ठिकाणी. निसर्गाचा योग्य तो मान राखल्यास तो पण त्याच्याकडे असलेली अनेक गुपिते आपल्यासमोर उघडी करतो. त्यामुळं पर्यटन करताना काळजी घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.


महत्वाच्या बातम्या:


Travel : हेच ते सुख! महाराष्ट्रातील 'या' सुंदर ठिकाणाची इंग्रजांनाही भुरळ, महाबळेश्वरच्या शेजारचं सुंदर हिल स्टेशन