Nashik News : एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात नाशिक (Nashik) जिल्हा केंद्रस्थानी असताना नाशिकसाठी अभिमानाची बाब घडली आहे. नुकत्याच पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) राज्यसभेच्या 11 जागांवरील उमेदवार निवडण्यात आले, यात नाशिकचे साकेत गोखले (Saket Gokhale) हे देखील राज्यसभेवर तृणमूल काँग्रेस पक्षाकडून निवडून आले आहेत. त्यामुळे गोखले यांचे बालपण गेलेल्या नाशिकच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. 


पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या 11 जागांवरील उमेदवार निवडणुकीआधीच बिनविरोध निवडून आल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, डोला सेन, साकेत गोखले यांच्यासह सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यसभेच्या 11 जागांसाठी 24 जुलैला मतदान होणार होते. मात्र, सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने निवडणूक होणार नाही हे निश्चित झाले आहे. यात विशेष म्हणजे नाशिक (Nashik) येथील साकेत गोखले हे देखील राज्यसभेवर निवडून आले आहेत. त्यानंतर इकडे हजारो किलोमीटर दूर नाशिकच्या पंचवटीत राहणाऱ्या पित्याला खासदाराचा बाप झाल्याचा आनंद झाला. सोबतच साकेत गोखले यांच्या रूपाने नाशिकचा आणखी एक खासदार झाल्याचा इतिहास झाला. 


दरम्यान साकेत गोखले हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमुल कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. तत्पूर्वी ते ठाणे येथे माहीती आधिकार कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांना तृणमुल कॉग्रेसने पक्षात काम करण्याची संधी दिली. झोकून देउन काम केल्याच्या बदल्यात यंदा तृणमृल कॉग्रेसने (Trinamul Congress) त्यांच्या कोट्यातून साकेत गोखले यांना राज्यसभेवर पाठविले. साकेत यांच्या निवडीसोबत नाशिकला आणखी एक खासदार राज्यसभेत पोहोचल्याचा इतिहास झाला. खासदार साकेत यांचे वडील सुहास गोखले म्हणाले की, 'आयुष्यभर राजकारणापासून दूर राहिलो, पण मुलगा मात्र खासदार झाल्याचे अप्रुप असल्याचे सांगितले. या घटनेच्या निमित्ताने नाशिकचा युवक राज्यसभेत पश्चिम बंगालच्या कोट्यातून खासदार झाल्याचा इतिहास लिहिला गेल्याचे ते म्हणाले. 



साकेत गोखले यांचे कुटुंब मूळ नाशिकचे



 खासदार साकेत गोखले यांचे कुटुंब मूळ नाशिकचे (Nashik Panchavati) असून शहरातील पंचवटी भागातील कपालेश्वर मंदीरामागे खांदवे सभागृहाजवळ त्यांचे घर आहे. त्यांचे  वडील सुहास गोखले हे तेथेच रहायला आहे. मूळ नाशिककर असलेल्या साकेत गोखल यांच्या आजी आणि आजोबा हे दोघेही नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु.स.रुंग्ठा विद्यालयात शिक्षक होते. सुहास गोखले यांचे पुत्र साकेत यांचे शिक्षण मुंबईत विल्सन कॉलेजला झाले. तेथेच माहीती आधिकार कार्यकर्ते म्हणून ते नावारुपाला आले. तर मुलगी अमेरिकेत डॉक्टरेक्ट करतात. वडील सुहास गोखले म्हणाले की, 'आज सकाळी साकेत यांचा दूरध्वनी आला. बाबा मी खासदार झालो. आयुष्यभर मी ज्या राजकारणापासून एकदम दूर आणि अलिप्त राहिलो, त्याच क्षेत्रात मुलगा खासदार झाला आणि मी खासदाराचा बाप झाल्याचे अप्रुप वाटले. अधिवेशन असल्याने जावे लागेल, मात्र त्याअगोदर नाशिकला येणार असल्याचे सांगितले.


इतर संबंधित बातम्या :