मुंबई : शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या अशोक खरात प्रकरणात (Ashok Kharat) ज्या राजकीय लोकांची नावं आली आहेत त्यांना चौकशीला कधी बोलावणार असा प्रश्न अनेकदा विचारला जात आहे. त्यावर आता एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी उत्तर दिलं आहे. या प्रकरणात साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास केला जात असून वेळोवेळी त्याची माहिती दिली जाणार असल्याचं तेजस्वी सातपुते (Tejaswi Satpute) यांनी सांगितलं.
अशोक खरात प्रकरणात अंजली दमानिया यांनी जाहीर केलेल्या मोबाईल सीडीआरमध्ये रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांचे नाव समोर आलं. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यावरून अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. अशोक खरातशी संपर्कात असलेल्या रुपाली चाकणकर आणि इतरांना एसआयटी चौकशीला कधी बोलावणार असा प्रश्न अंधारे यांनी विचारला होता.
Tejaswi Satpute PC On Ashok Kharat : नेमक्या काय म्हणाल्या तेजस्वी सातपुते?
तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, "या प्रकरणात नावे आलेल्या अनेकांना तपासणीसाठी कधी बोलावणार असे प्रश्न विचारले जात आहे. परंतु आतापर्यंत दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कारवाई केली जात आहे. गेली 17 दिवस एसआयटी तपास सुरू असून यापुढेही तपास सुरू असणार आहे. महत्त्वाच्या गुन्ह्यावर वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे."
त्याचसोबत अंजली दमानिया यांनी समोर आणलेल्या सीडीआरवरही सातपुते बोलल्या. सीडीआर लिकच्या बाबतीत शासन स्तरावर चौकशी सुरू असल्याचं त्या म्हणाल्या.
Ashok Kharat Viral Video : 4650 व्हिडीओ लिंक ब्लॉक केल्या
तेजस्वी सातपुते म्हणाल्या की, "अशोक खरातवर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल असून त्यापैकी 8 गुन्हे महिला अत्याचाराचे आणि तीन गुन्हे हे फसवणूक, अघोरी विद्या यासारखे आहेत. आतापर्यंत 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडे तपासणी केली. यामध्ये आरोपी खरात हा साक्षीदारांना भीती दाखवायचा आणि चिंचोके, खडे देऊन त्यांच्याकडून पैसे उकळायचा. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं सांगत त्याने महिलांचे लैंगिक शोषण केलं. इशानेश्वर मंदिरामध्ये हातचलाखी करून त्याने अनेकांना फसवलं आहे."
अशोक खरात प्रकरणी पीडितांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशा व्हिडीओ आणि फोटोवंर कारवाई करत ते काढून टाकण्यात आले आहेत. आतापर्यंत असे 4650 व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकण्यात आले आहेत, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.
ही बातमी वाचा:
