Ashok Kharat Case: भोंदू बाबा अशोक खरातच्या (Ashok Kharat) आर्थिक फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीच्या गुन्ह्यात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचले असून, परिवहन विभागाच्या (RTO) दोन बड्या अधिकाऱ्यांची नावे तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे 'समता' पतसंस्थेत संशयास्पद खाती आढळल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

Ashok Kharat Case: तपासाच्या रडारवर 100 हून अधिक बँक खाती

शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करत असताना 56 व्यक्तींच्या मालकीच्या 100 हून अधिक बँक खात्यांची चौकशी सुरू केली आहे. यामध्ये आरटीओ विभागातील दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर खाती उघडण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. हे व्यवहार सावकारकीचे आहेत की काळा पैसा पांढरा करण्यासाठी या खात्यांचा वापर झाला, याचा शोध आता विशेष तपास पथक (SIT) घेत आहे.

Ashok Kharat Case: बनावट खाती की वैयक्तिक व्यवहार?

पोलिसांसमोर आता सर्वात मोठे आव्हान हे आहे की, ही खाती संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःहून उघडली आहेत की त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून खरातने बनावट खाती तयार केली? जर ही खाती बनावट असतील, तर या अधिकाऱ्यांची वैयक्तिक आणि गोपनीय कागदपत्रे एका भोंदू बाबापर्यंत पोहोचली कशी? हा प्रश्न आता उपस्थित केला जात असून पोलीस या दोन्ही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

Ashok Kharat Case: SIT आणि ED ने तपासाचा फास आवळला

अशोक खरात प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, आता 'ईडी'ने (ED) देखील या आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी सुरू केली आहे. एसआयटीच्या हाती काही अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील कागदपत्रे लागली आहेत. गेल्या चार तासांपासून खरातची कसून चौकशी सुरू असून, उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. यावेळी ठोस तांत्रिक पुरावे सादर करून पोलीस त्याच्या वाढीव कोठडीची मागणी करणार आहेत.

Ashok Kharat Case: आणखी पीडित समोर येण्याची शक्यता

जमीन खरेदी-विक्री आणि इतर आर्थिक व्यवहारांत फसवणूक झालेले आणखी काही तक्रारदार आता पोलिसांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे खरातवर येत्या काळात आणखी काही गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आरटीओ विभागातील या दोन अधिकाऱ्यांच्या चौकशीतून विभागातील आणखी काही बड्या माशांची नावे बाहेर येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा 

धाराशिव हादरलं ! पतीकडूनच पत्नीची हत्या, 8 वर्षाच्या चिमुकलीलाही संपवलं; घटनेनंतर स्वत:हून पोलीस ठाण्यात