नाशिक : मंत्रिपद न मिळालेले सुधीर मुनगंटीवार संधी मिळेल तेव्हा एकतर खदखद व्यक्त करतात किंवा टोमणा तरी मारतात. त्याचा प्रत्यय नाशिकमधल्या व्याख्यानमालेतही आला. व्याख्यानमालेत येणाऱ्याचं प्रमोशन होतं असा संवाद आयोजक आणि मुनगंटीवारांमध्ये झाला होता. त्याला संदर्भ होता गेल्या व्याख्यानमालेतल्या फडणवीसांच्या उपस्थितीचा. त्या संवादावर बोट ठेवताना सुधीर मुनगंटीवारांनी केलेलं वक्तव्य भाजप श्रेष्ठींना कितपत पटेल कुणास ठाऊक. कारण प्रमोशन होण्यासाठी सरकार टिकलं पाहिजे असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं. 

या व्याख्यानमालेत काँग्रेसचे प्रणिती शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अरविंद सावंत देखील मार्गदर्शन करणार आहेत. या दोघांचं प्रमोशन होण्यासाठी सरकारमध्ये बदल होणं गरजेचं आहे याची देखील मुनगंटीवारांनी आठवण करून दिली. आता मुनगंटीवारांच्या मुखी सरकार बदलाची भाषा येऊ लागल्यानं चर्चांना उधाण आलंय. 

नाशिकमध्ये भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्याच्या निमित्ताने विचारवंतांचे जाहीर व्याख्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला.

माझं प्रमोशन होणार असेल तर...

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "जो या कार्यक्रमाला येतो त्यांचा प्रमोशन होतो असं आयोजकांनी सांगितले. पण माझं प्रमोशन होण्यासाठी माझं सरकार राहिले पहिजे. उद्या आणि परवा येणारे वक्ते यांची नावं पाहिली तर त्यांचे देखील प्रमोशन होणार का? उद्या प्रणिती शिंदे आणि पर्वा अरविंद सावंत येणार आहेत. माझं प्रमोशन पुढे होणार असेल तर मग या दोघांना आमच्या पक्षात घ्यावे लागणार."

पहिल्यांदा आमदार झाल्यावर टॅक्सीमधून विधानभवनात जात होतो. त्यावेळी ड्रायवर म्हणाला की विधानभवनाला बॉम्बने उडवले तर राज्यातील सगळे आनंदी होतील. त्या ड्रायव्हरला माहिती नव्हते की मी आमदार आहे. ज्या लोकशाही भवनात मी पहिल्यांदा निवडून गेलो त्या भवनावर लोकांचे किती राग आहे हे मला कळलं. 

लोकसभेत मी पहिल्यांदा लढलो तेव्हादेखील हरलो होतो आणि आता देखील हरलो. त्यामुळे बहुतेक माझ्या नशिबात लोकसभा नसेल असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

राहुल सोलापूरकरवरील कारवाईवर गृहविभाग सांगेल

शिवरायांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकरवर कारवाई का होत नाही या प्रश्नावर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "त्याचे कारण मी सांगू शकत नाही, गृह विभाग सांगेल. मी चंद्रपूरमधील फक्त एक आमदार आहे. मी सांस्कृतिक मंत्री होतो त्यावेळी शिवाजी महाराजांच्या विचारांची सेवा करण्याची संधी मिळाली. मी वाघ नखे आणले, अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवले. छत्रपती आमच्यासाठी देव नसतील, पण देवा पेक्षा कमी नाहीच. त्यांचा अपमान करणाऱ्याला दंडीत केले पाहिजे. यासंदर्भात अशासकीय विधायक मांडलं आहे. कदाचित जून-जुलैमधील अधिवेशनात त्याची मी आग्रही मागणी करेन. कोणीही उठून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचे धाडस करू नये. महाराज होते म्हणून तुम्ही आणि आम्ही आहोत. ते जर नसते तर आमचा देश लोकशाही मार्गाने पुढे जाऊ शकला नसता."