नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) कांद्याचे लिलाव आज (20 सप्टेंबर) सलग दुसऱ्या दिवशी ठप्प आहेत. कांदा व्यापाऱ्यांनी काल (20 सप्टेंबर) सकाळपासून बंद पुकारल्यानं (Onion traders go on indefinite strike in nashik) कांद्याचे व्यवहार बंद पडले आहेत. व्यापाऱ्यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. बंदमध्ये सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने आणि गाळे जप्त होणार आहेत. ही कारवाई बाजार समितीला करावी लागणार आहे. ही कारवाई न केल्यास बाजार समिती संचालक मंडळ आणि सचिवांवर राज्य सरकारच्या पणन खात्याकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. 


बाजार समित्यांना आज (21 सप्टेंबर) दुपारी 12 वाजेपर्यंत कारवाईचा अहवाल राज्य सरकारला सादर करायचा आहे. दरम्यान, कांदा प्रश्नावर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीत व्यापारी प्रतिनिधी, बाजार समिती प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


लासलगाव बाजारपेठेत शुकशुकाट 


दररोज सकाळीनऊ वाजल्यापासून कांद्याचे लिलाव लासलगाव बाजार समितीमध्ये सुरू होतात, त्यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरू असते. मात्र, आज लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट आहे. पालकमंत्री दादा भुसे यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला व्यापारी असोसिएशन, नाफेडचे अधिकारी, त्याचबरोबर जिल्हा उपनिबंधक यासह बाजार समिती संचालक मंडळ तसेच त्यांच्या प्रतिनिधींना देखील आमंत्रित करण्यात आलं आहे.


दुसरीकडे आज पणन विभागाने  बाजार समित्यांनी दुपारपर्यंत धडक कारवाई करावी, अशा स्वरूपाचे स्वरूपाचे आदेश दिलेत. त्यामुळे प्रत्येक बाजार समितीमध्ये अकरा वाजल्यापासून संचालक मंडळाच्या बैठका होणार आहेत. तिथं पुढील नेमकी कारवाई व्यापाऱ्यांवर काय करायची? अशी चर्चा होण्याची शक्यता आहे. 


बाजार समित्या नेमक्या कोणासाठी?


बाजार समिती या खरंतर शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी असताना शेतकऱ्यांनाच बाजूला ठेवून व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. व्यापाऱ्यांचे हितरक्षण बाजार समित्या करतात की काय? अशी शंका उपस्थित होत आहे. गेल्या 24 तासांपासून व्यापाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे बाजार समित्यांच्या भूमिकेवर संशय घेत पणन विभागाने, जर बाजार समित्यांनी व्यापाऱ्यांवर कारवाई केली नाही संचालक मंडळासह सचिवांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 


त्यामुळे आज दिवसभरामध्ये काय काय घडामोडी घडतात हे अत्यंत महत्त्वाचं असेल. दुसरीकडे, आजच्या दिवसांत व्यापारी लगेच माघार घेतील अशी शक्यता खूप कमी आहे, कारण याआधी तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली होती. मात्र, त्या बैठकीमध्ये तोडगा निघाला नव्हता. आज पालकमंत्री दादा भुसे काय करतात हे औत्सुक्याचं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या