नाशिक: मागील काही दिवसांमध्ये नाशिकमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. नाराजीनाट्य, पक्षातून हकालपट्टी, पक्षांतर यासह अनेक मोठ्या घडामोडींनी नाशिकचं राजकारण चर्चेत आलं. त्याचबरोबर आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही नगरसेवकांनी पक्षांतर देखील केलं. या सर्व घडामोडींमध्ये मोठं खिंडार पडलं ते शिवसेना ठाकरे गटाला.  भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने गेल्या काही दिवसांमध्ये  अख्खी संघटना खिळखिळी केली त्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटात संघटनात्मक बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पक्ष कार्यकरणीची देखील फेर रचना होणार आहे. 

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत. जुलै अखेरीस उद्धव ठाकरे नाशिकमध्ये मुक्कामी असणार आहेत. दोन दिवसीय दौऱ्यात नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा निहाय कामकाजाचा ते आढावा घेणार आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. मराठीच्या मुद्द्यावर मुबंईत पार पडलेल्या विजयी मेळावानंतर शिवसेनेत उत्साह वाढला असल्याचं दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला पक्ष पातळीवर सुरूवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षात गळती सुरू असल्याने मरगळ झटकून शिवसैनिकांना कामाला लागण्याच्या सूचना देखील पक्षाकडून देण्यात आल्या आहेत.

सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश

नाशिकमधील नेते सुधाकर बडगुजर यांनी काही दिवसांपूर्वी भाजपपक्षामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढली आहे. सुधाकर बडगुजर यांची काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती, त्यानंतर त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्यासोबत बबन घोलप आणि काँग्रेस तसेच इतर पक्षांमधील अनेक माजी पदाधिकारी आणि नगरसेवकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि नवनियुक्त महानगरप्रमुख मामा राजवाडे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात होता. सुनिल बागुल ( शिवसेना उपनेते, उबाठा ), मामा राजवाड़े ( महानगर प्रमुख, उबाठा ), गणेश गीते ( मा. स्थायी समिति सभापती ), सचिन मराठे (उपजिल्हाप्रमुख, मा. नगरसेवक, उबाठा ), प्रशांत दिवे ( मा. नागरसेवक, उबाठा ), सिमा ताजने ( मा. नगरसेविका,उबाठा ), कमलेश बोडके ( मा. नगरसेवक ), बाळासाहेब पाठक ( जिल्हा संघटक, उबाठा ), गुलाब भोये ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा ), कन्नु ताजने ( उपजिल्हा प्रमुख, उबाठा ), शंभु बागुल ( युवसेना विस्तारक, उबाठा ), अजय बागुल ( श्रमिक सेना जिल्हा प्रमुख ) या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाची साथ सोडली आहे.

त्याचबरोबर ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी उद्धव ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला, गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने आणि शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरे गटाला मोठं खिंडार पाडलं असून आगामी निवडणुकीसाठी आता पक्षाने पुन्हा एकदा नव्याने उभारणी करायला सुरूवात केली आहे.