Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) रविवारी (दि.23) नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळा (Kumbh Mela 2027) तयारीसंदर्भात आढावा बैठक घेणार असून, काही ठिकाणांना भेटी देणार आहेत. राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच नाशिकमध्ये सिंहस्थ तयारीचा आढावा घेणार आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) दिला आहे. फडणवीस यांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, असे ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांनी म्हटले आहे. ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा वादात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतल्यानंतर नाशिकचा विकास झाला नाही. जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री नाही. महापालिकेच्या कामावर सत्ताधारी पक्षाचा अंकुश नाही, अशा विविध कारणांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याला विरोध केला जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना नाशकात पाय ठेवू देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणारी सिंहस्थ आढावा बैठक होऊ देणार नाही, असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख?
डी. जी. सूर्यवंशी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदा नाशिकमध्ये येत आहेत. आम्हाला असे कळले की ते महाकुंभाच्या नियोजनासाठी येत आहेत. परंतु, मागील तीन वर्षापासून नाशिक महापालिकेमध्ये कुठलीही जनरल बॉडी नाही, नगरसेवक नाहीत. महापालिकेचा मागील तीन वर्षाचा कारभार पाहिला तर कुठलाही वचक राहिलेला नाही. अवघ्या दीड वर्षांवर कुंभमेळा येऊन ठेपलेला आहे. कुठलेही निधीचे नियोजन अजून झालेले नाही. गेल्या अनेक दिवसापासून नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नाही तर अंमलबजावणी तर कशी होणार? राज्याच्या जनतेने जे बहुमत दिले आहे त्याचा कुठेही आदर होताना दिसत नाही. त्यामुळे नाशिकमधील बैठक आम्ही होऊ देणार नाही. आम्ही याचा निषेध करतो. आम्ही यांना काळे झेंडे दाखवू. 2014 साली त्यांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं, आज त्याला अकरा वर्षे झाली. महाकुंभ हा हिंदूंच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मात्र याचे कुठलेही नियोजन दिसून येत नाही. त्यामुळे आम्ही नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांना पाय ठेवू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय.
आणखी वाचा