Jitendra Awhad नाशिक : शिर्डीत (Shirdi) पक्षाच्या शिबिरात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड  (Jitendra Awhad)  यांनी प्रभू श्रीराम (Shri Ram) मांसाहारी असल्याचे वक्तव्य केले. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर नाशिकमध्ये साधू महंतांनी पोलीस ठाणे गाठत आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यापाठोपाठ आता शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जितेंद्र आव्हाडांविरोधात नाशिकच्या शिंदे गटाच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली आहे. 


राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता, त्यांनी 14 वर्ष वनवास भोगला होता, मग ते शाकाहारी कसे असू शकतात? असं वक्तव्य  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. नाशिकमध्ये हिंदू धर्मीय एकवटले असून त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचे दिसून आले. 


शिवसैनिक काय करतील, हे सांगण्याची गरज नाही


यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते म्हणाले की,  प्रभू श्रीराम आणि नाशिकचे एक वेगळे नाते आहे. प्रभू श्रीरामाच्या आगमनाची संपूर्ण देश वाट बघत आहे. धार्मिक वातावरण संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. असे असताना देखील धार्मिक तेढ निर्माण करायची.  मतांचे राजकारण ज्यांच्या डोक्यात आहे त्या जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आंदोलन करण्यात आले. हे केवळ प्रतिकात्मक आंदोलन आहे. अशाच पद्धतीचे वक्तव्य जर आव्हाड करणार असतील तर शिवसैनिक काय करतील, हे त्यांना सांगण्याची गरज नाही. 


इंडिया आघाडीच खर स्वरूप आलं समोर


माझा खरा प्रश्न संजय राऊतांना आहे की, आपण आता जितेंद्र आव्हाडांना काय बोलणार?  आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावर आपले काय म्हणणे आहे? कारण त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही बसले आहात. इंडिया आघाडीच खर स्वरूप रावणाचा एक चेहरा या निमित्ताने उघड झाला आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. 


...तर घरात घुसून त्यांना त्यांची जागा दाखवू


आम्ही एक ठराव केला आहे की, जितेंद्र आव्हाडांना यापुढे जीतुद्दिन ओवेसी याच नावाने बोलायचे. कारण जो माणूस प्रभू रामाबद्द्दल इतके भयानक शब्द वापरतो. त्या माणसाला नक्कीच त्याची जागा आम्ही सर्व शिवसैनिक दाखवून देऊ. त्यांनी आता जर असे वक्तव्य केले तर त्यांच्या घरात घुसून आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू, असा इशारा प्रवीण तिदमे यांनी दिला. यावेळी जय श्रीरामचा जयघोष करण्यात आला. आंदोलनाला शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.   


इतर महत्वाच्या बातम्या


Sushma Andhare : सुषमा अंधारेंना 'ते' वादग्रस्त वक्तव्य भोवलं; मालेगावात गुन्हा दाखल