Bhaskar Jadhav: निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट  सीबीआय, ईडी या स्वायत्त वेगवेगळ्या संस्थांचा वापर मागील 60- 65 वर्षांमध्ये कधीही झाला नाही. एवढा वापर आज राजकारणासाठी होत असल्याची टीका ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. भास्कर जाधव हे संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमानिमित्ताने आज नाशिकमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. भास्कर जाधव म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात  महाराष्ट्रात वेदांता, फॉक्सकॉन, टाटा एअर बस यासारखे अनेक कारखाने येऊ घातलेले आहेत. ते महाराष्ट्राच्या बाहेर जात असताना आमच्यावरच खापर फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी खुलेआम पणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलेले आहे. हिम्मत असेल तर एका व्यासपीठावर या आणि हे कारखाने तुमच्या कारकिर्दीमुळे आणि नाकारतापणामुळे गेले की आमच्यामुळे गेले हे एकदा संपूर्ण महाराष्ट्राला कळू द्या. कर्नाटक संदर्भातील प्रश्न असतील भाजपचे सरकार कर्नाटकात केंद्रात आहे. म्हणून त्या ठिकाणावरील मराठी माणसावर वाढलेला अत्याचार असतील असे अनेक प्रश्नांवर जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले. 


पुढे जाधव म्हणाले, सत्ताधाऱ्यांकडून वारंवार खोटे बोलून महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केली जात आहे. महाराष्ट्रात राबविण्यात येणारे अनेक प्रकल्प गुजरातला जात आहेत. मात्र स्वतःला महाराष्ट्राचे सुपुत्र मिरवत असताना अशा प्रकारे महाराष्ट्राच्या  ताटातला घास जाणीवपूर्वक काढून घेत असताना लक्षात कस येत नाही, असा सणसणीत सवालही जाधव यांनी यावेळी केला. 


नारायण राणेंवर बोलताना जाधव म्हणाले, राणेबद्दल काहीही बोलायचं नाही असं ठरवलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर नारायण पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीका करतात. मात्र त्यांच्याकडे कुणीच लक्ष देत नाही. शिवाय त्यांना राज्यात एखाद्या सभेला देखील बोलवलं जात नाही. शिवाय त्यांच्या पक्षात सुद्धा त्यांना महत्त्व राहिलेलं नाही असं म्हणत नारायण राणे यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला .


सीबीआय, ईडीचा वापर राजकारणासाठी...
तसेच सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाई आणि न्यायालयाच्या निकालांवर बोलताना म्हणाले की, आपल्या देशात निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट अशा वेगवेगळ्या सीबीआय, ईडी या स्वायत्त संस्थांचा वापर मागील 60- 65 वर्षांमध्ये कधीही झाला नाही. एवढा वापर आज  राजकारणासाठी होत आहे.  या स्वायत्त संस्थांबाबत सगळ्याच ठिकाणी संशय व्यक्त केला जात आहे. निवडणूक आयुक्त अनेक तास चर्चा झाली. त्यांच्याबद्दलचा हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये सुरू होता, तो बाजूला सारला गेला आणि बारा तासाच्या आतमध्ये त्यांची फाईल क्लिअर केली गेली. त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं की  प्रशासनाचा कारभार गतिशील झाला आहे. यावर सुप्रीम कोर्टाने देखील आश्चर्य व्यक्त केले. यावरून या स्वायत्त संस्था कोणाच्यातरी विचारानुसार, कोणाच्यातरी राजकीय मर्जीनुसार काम करतात की काय अशी शंका निर्माण झाली असल्यामुळे कदाचित या तारखांवर तारखा पडत असतील असा प्रश्न उपस्थित करत स्वायत्त संस्थांच्या कारभारावर टीका केली आहे .