Saptashrungi Gad Shakambhari Navratri 2024 नाशिक : साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धे शक्तीपीठ म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवाला (Shakambhari Navratrotsav) गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे. यंदा अयोध्येतील राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर 21 जानेवारीपासून पंचदिनात्मक श्रीराम पंचायतन याग आयोजित करण्यात आला आहे. 


वर्षभरात सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव हे दोन मुख्य उत्सव पार पडतात. रविवारी आदिमायेच्या धनुर्मास उत्सवाची सांगता झाली होती. आता गुरुवारपासून (दि. 18) ते 25 जानेवारीपर्यंत शाकंभरी नवरात्रोत्सव होणार आहे. देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाप्रमाणेच शाकंभरी नवरात्रोत्सवाचेही तितकेच महत्त्व आहे.


अशी आहे परंपरा


शारदीय नवरात्रोत्सवात ज्या भाविकांना काही कारणास्तव घटस्थापना करता आली नाही, त्या भाविकांनी शाकंभरी नवरात्रोत्सवात घटस्थापना केली तरी चालते, अशी श्रद्धा आहे. नवरात्रोत्सवप्रमाणेच सर्व धार्मिक विधी शाकंभरी नवरात्रोत्सवात होतात. उत्सवात सकाळी सातला श्री भगवतीची पंचामृत महापूजा, दिवसभरात शांतीपाठ, देवीस्तुत्याचे पाठ व पठण होणार आहे.


दुर्गाष्टमीच्या दिवशी होतो प्रारंभ


देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सास दुर्गाष्टमीच्या दिवशी प्रारंभ होतो. नित्यनियमाने संपूर्ण पूजाअर्चा झाल्यानंतर दही भात व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते. शुद्ध नवमीस शाकंभर नवरात्राची सांगता होते. या दिवसी दूध घोटून त्याचा नैवेद्य दाखविला जातो व प्रसाद वितरित केला जातो.


प्रभू श्रीराम पंचायतन याग


२१ ते २५ जानेवारीदरम्यान पंचदिनात्मक प्रभू श्रीराम पंचायतन याग होणार आहे. या सर्व धार्मिक विधींसाठी श्री सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट, पुरोहित संघ व ग्रामस्थ प्रयत्नशील असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभाग व्हावे, असे आवाहन ट्रस्ट व पुरोहित संघाने केले आहे.


अशी आहे आख्यायिका


भूतलावर महाभयंकर दुष्काळ पडला होता. पाण्याशिवाय जीवमात्रांना जगणे अशक्य झाले होता. ऋषी-मुनी-देव तपस्वी व भक्तांनी त्यावेळी देवीची आराधना केली होती. देवीने प्रसन्न होऊन तिच्या शरीरापासून वनस्पती म्हणजे शाक निर्माण केली. या वनस्पतीने विश्वातील जीवजंतूंना दुष्काळात अन्न म्हणून पुरवून त्यांना जगविले. देवीने उत्पन्न केलेल्या संजीवनी शाक वनस्पतीमुळे जीवरक्षा झाल्याने देवीला शाकंभरी म्हणून ओळखू लागल्याची आख्यायिका आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik News : "एक रावण को श्रीराम ने मारा, हुकूमशाही के रावण को हम सब मारेंगे"; नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटात होर्डिंग वॉर


Dhule Loksabha Election : मागील तीन टर्ममध्ये काँग्रेसला यश नाही; राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धुळे लोकसभेवर दावा, तयारीलाही सुरुवात