नाशिक : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) बंडखोरांवर कारवाई केल्यानंतर आता पक्षविरोधी काम करणारे माजी नगरसेवक शशिकांत जाधव (Shashikant Jadhav) यांच्यासह पदाधिकाऱ्यांची भाजपातून हकालपट्टी करावी, अशी मागणी आमदार सीमा हिरे (Seema Hiray) यांच्यासह सातपूर मंडलाच्या वतीने शहराध्यक्ष प्रशांत जाधव (Prashant Jadhav) यांच्याकडे करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाला (BJP) घवघवीत यश आल्यानंतर पक्षाने आता बंडखोरांसह पक्षविरोधी काम करणाऱ्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे.
विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्हीही जागांवर भाजपाचे विद्यमान आमदारच निवडून आले. भाजपाने हे यश मिळविल्यानंतर आता पक्ष सोडून गेलेले अनेकजण पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात अनेकांनी बंडखोरी करत पक्षविरोधी काम केल्याचे समोर आले आहे.
शशिकांत जाधवांची हकालपट्टी करा
ऐन निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या माजी नगरसेवक दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, पल्लवी पाटील यांच्यासह भाजपा कामगार मोर्चाचे विक्रम नागरे, अमोल पाटील, सार्थक नागरे, स्वप्नील पाटील, नीलेश भंदुरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आता नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात पक्षात राहून पक्ष विरोधी भूमिका बजावणाऱ्याकडे पक्षाने आपली वक्रदृष्टी वळवली आहे. यामध्ये माजी नगरसेवक शशिकांत जाधव यांचा समावेश आहे.
सुधाकर बडगुजरांचा प्रचार केल्याचा आरोप
जाधव हे ऐन निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश करणार होते. मात्र, त्यांचा काही कारणास्तव पक्षप्रवेश होऊ शकला नाही, असे असताना देखील त्यांनी भाजपा उमेदवार सीमा हिरे यांचे काम न करता विरोधी पक्षातील शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांचा प्रचार केला असल्याचा स्पष्ट आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पत्रावर आमदार सीमा हिरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, गणेश बोलकर, रामहरी संभेराव, रवींद्र जोशी, शिवाजी शहाने, सीए मनोज तांबे, राजेश दराडे, संजय राऊत आदींसह सातपूर मंडल पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या