Nashik MLC Election:  विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघातून (Nashik Graduate Constituency) काँग्रेसने (Congress) मोठी खेळी खेळली. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने सत्यजीत तांबे हे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत उमेदवार असणार आहेत. 


महाविकास आघाडीमध्ये झालेल्या चर्चेनुसार नाशिक पदवीधर विधान परिषदेची जागा ही काँग्रेसला देण्यात आली होती. काँग्रेसने या निवडणुकीत पुन्हा एकदा डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातून तीन वेळेस विजयी झाले आहेत. आज सकाळीदेखील सुधीर तांबे हेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असतील अशी स्पष्ट चिन्हं होती. बुधवारी, सुधीर तांबे यांनी निवडणूक अर्ज भरण्यास जाणार असल्याचे ट्वीटही केले होते. तर, दुसरीकडे सुधीर तांबे यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे भाजप कोणाला उमेदवारी जाहीर करणार, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. 


मी काँग्रेसचाच उमेदवार- सत्यजीत तांबे


सत्यजीत तांबे यांनी आज महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला. माध्यमांशी बोलताना, सत्यजीत तांबे यांनी म्हटले की, काही कारणास्तव माझ्या नावाने असलेला ए बी फॉर्म वेळेत आला नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून उमेदवारी  अर्ज दाखल केला असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी आपण काँग्रेसचे उमेदवार असल्याचे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेस पक्षासाठी सोडली होती. त्यामुळे उमेदवार कोणता असावा हे काँग्रेसने ठरवायचे होते असेही त्यांनी म्हटले. 



सुधीर तांबे यांच्याकडून पक्ष शिस्तभंग?


काँग्रेसकडून नाशिक पदवीधर मतदारसंघातून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पक्षाकडून अधिकृत घोषणाही करण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी सुधीर तांबे यांच्याऐवजी सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे सुधीर तांबे यांनी पक्षशिस्तीचा भंग केला का, अशी चर्चा सुरू झाली आहे. सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी पक्षाच्या नेतृत्वासोबत चर्चा करण्यात आली होती, असे सुधीर तांबे यांनी म्हटले. वरिष्ठांसोबत चर्चा केल्यानंतर सत्यजीत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असल्याचे सुधीर तांबे यांनी म्हटले.